जयपूर,

राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांना न्यायालयानं दिलासा दिला आहे. सचिन पायलट यांच्या गटाला उच्च न्यायालयानं 24 जुलैपर्यंत दिलासा देत सभापती सी.पी.जोशी यांना कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला आहे.

 माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या गटानं विधानसभेचे सभापती सी.पी.जोशी यांनी बजावलेल्या नोटिसीविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या प्रकरणी न्यायालयात पहिल्यांदा सुनावणी झाली. त्यानंतर आजपर्यंत सर्वांनी न्यायालयासमोर आपलं मत मांजलं. राजस्थान उच्च न्यायालयात मंगळवारी यावरील सुनावणी घेण्यात आली. दरम्यान, न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला असून 24 जुलैपर्यंत या आमदारांविरोधात कोणतीही कारवाई न करण्याचे आदेशही सभापतींना देण्यात आले आहेत.

 एकीकडे 19 आमदारांना उत्तर देण्यासाठी 3 दिवसांची मुदत देण्यात आली होती. तर दुसरीकडे बसपच्या आमदारांना काँग्रेसमध्ये आणण्याबाबत केलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झालेली नाही, असा युक्तीवाद मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात केला. दरम्यान, यावेळी मुकुल रोहतगी यांनी नोटिसीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत अनेक मुद्द्यांवरही भाष्य केलं.

अवश्य वाचा