बिहार विधानसभा आणि विविध राज्यांमधील लोकसभा व विधानसभेच्या 65 जागांकरिता पोटनिवडणुका एकाच वेळी घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने शुक्रवारी घेतला. योग्य वेळी निवडणुकीची घोषणा केली जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले.

बिहार विधानसभेची मुदत 29 नोव्हेंबरला संपुष्टात येत असल्याने तत्पूर्वी निवडणूक घ्यावी लागेल. याशिवाय कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघ आणि विविध राज्यांमधील 64 विधानसभेच्या जागा रिक्त आहेत. बिहार विधानसभेबरोबरच या 65 जागांची निवडणूक एकाच वेळी घेतली जाईल, असा निर्णय निवडणूक आयोगाच्या बैठकीत घेण्यात आला. पोटनिवडणुकांच्या संदर्भात राज्यांचे मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडून प्राप्त झालेल्या अहवालांवर चर्चा करण्यात आली.

कायदा व सुवस्था राखणे आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांची ये-जा करणे सोयीचे व्हावे या उद्देशानेच बिहार आणि पोटनिवडणुका एकत्रित घेण्यात येत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. पोटनिवडणुकांमध्ये मध्य प्रदेशमधील 27 जागांच्या निवडणुका या सत्ताधारी भाजपसाठी महत्त्वाच्या आहेत.

 

अवश्य वाचा