नवी दिल्ली, वृत्तसंस्था
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने लसीला परवानगी दिली. लस कशी द्यायची याची रंगीत तालीम झाली. लस साठवून ठेवण्याची जागा ठरली. लस कुठे देणार या आरोग्य केंद्राची यादी तयार झाली. सर्वात अगोदर कोणत्या व्यक्तींना लस द्यायची ते ठरलं. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. मग आता लस टोचणार कधी? या प्रश्नाचे उत्तर अजून तरी देण्यात आलेले नाही. भारतात दोन लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोवॅक्सिन या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.
या दोन्ही वॅक्सिन अर्थात लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत, असे ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था) म्हटले आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी यापूर्वीच लसीचे पाच कोटी डोस तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अडीच कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, डीसीजीआयने या दोन लसींना मान्यता दिल्यामुळे भारतात दोन्ही लसींचा मार्ग मोकळा झाला आहे. सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसर्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे देशात लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
719 जिल्ह्यांमधील 57 हजार स्वयंसेवकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. लसीकरण करणार्या 96 हजार कर्मचार्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. शिवाय, रजिस्ट्रेशन आणि व्हेरीफिकेशन सरकारच्या कोविन अॅपवरुन सुरू असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
एक निर्णायक क्षण!
जागतिक महामारीविरोधातील भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण! सीरम आणि भारत बायोटेकच्या लसींना डीसीजीआयच्या मंजुरीमुळे एक स्वस्थ आणि कोविडमुक्त भारताच्या मोहिमेस बळ मिळेल. या मोहिमेसाठी जीव तोडून प्रयत्न करत असलेल्या शास्त्रज्ञ-नवनिर्मात्यांना शुभेच्छा व देशवासियांचे अभिनंदन.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
अफवांना बळी पडू नका - केंद्रीय आरोग्यमंत्री
भारतात जगभरातील सर्वात मोठ्या लसीकरण प्रक्रियेला सुरुवात होत असतानाच अनेक अफवा पसरण्याचीही शक्यता आहे. पण, अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केलं आहे.
कोविशिल्डला मंजुरी मिळाली आहे. ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असून, पुढील काही आठवड्यात लोकांना देण्यासाठी तयार आहे.
- अदर पुनावाला, सीरम सीईओ
दोन्ही लसी 110 टक्के सुरक्षित आहेत. सुरक्षिततेची शंका असेल, तर आम्ही त्याला कधीच मान्यता देणार नाही.
- व्ही.जी. सोमाणी, डीसीजीआयचे संचालक