। श्रीनगर । वृत्तसंस्था ।
जम्मू कश्मीरच्या शोपियान भागात चकमक झाल्याचं वृत्त आहे. दहशतवाद्यांविरोधात सैन्यदल आणि पोलीस यांची संयुक्त मोहीम असून यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.बडगाम जिल्ह्यात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्याने सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली होती. त्या मोहिमेदरम्यानच ही चकमक सुरू झाली. येथे झालेल्या चकमकीदरम्यान जम्मू कश्मीर पोलीस दलातील एसपीओ अल्ताफ अहमद शहीद झाले आहेत. या संपूर्ण परिसरात अद्यापही शोधमोहीम सुरू आहे.
दरम्यान, पुलवामा येथील एका रहिवासी भागात केलेल्या शोधमोहिमेला यश आलं आहे. येथील रहिवासी भागाला संपूर्णतः घेरण्यात आलं आणि या मोहिमेत एका दहशतवाद्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा आढळला आहे.हे दहशतवादी नेमक्या कोणत्या संघटनेचे आहेत, याचा शोध अद्याप लागलेला नाही. सुरक्षा दलांची शोधमोहीम अद्यापही सुरू आहे.