। शिकागो । वृत्तसंस्था ।
अनेकदा आपण हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर खूश होऊन वेटरला टीप देतो आणि त्याच्या कामाचं कौतुक करतो. साधारणपणे काही रुपयांमध्ये ही रक्कम असते. पण कधी कुणी वेटरला लाखो रुपये टिपमध्ये दिल्याचं ऐकलं आहे का? परंतु अमेरिकेतील शिकागोमध्ये एका जोडप्यानं चक्क साधारण दीड लाख रुपये टीप म्हणून दिल्याचं समोर आलं आहे. या कपलने 2 हजार डॉलर टीप म्हणून दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे या रेस्टोरंटने स्वतः सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. त्यांनी 2 हजार डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात 1,45,149 रुपयांची टीप दिली आहे.
रेस्टोरंटने फेसबुकवर याचं बिल शेअर केलं असून यामध्ये हे कपल 20 वर्षांपूर्वी इथं भेटल्याचं म्हटलं आहे. दरवर्षी ते या ठिकाणी येतात. यावर्षी त्यांना याठिकाणी भेटून 20 वर्ष पूर्ण झाल्यानं त्यांनी 2 हजार डॉलरची टीप दिली. हे बिल शेअर करत रेस्टोरंटने याला खास कॅप्शन दिलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मया कपलने 20 वर्षांपूर्वी आमच्या या रेस्टोरंटमधून प्रवासाला सुरुवात केली होती. 12 फेब्रुवारी या दिवाशी ते दरवर्षी लकी क्लबमध्ये येत असतात. दरवर्षी या दिवशी साडेसात वाजता ते 46 क्रमांकाच्या बुथवर येत असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. याचबरोबर आम्ही दरवर्षी त्यांना याचठिकाणी जागा देतो. त्यांच्या आयुष्यात या दिवसाचं खास महत्त्व आहे. या अवघड काळात या जोडप्याचं असं वागणं आम्हाला हिंमत देत आहे. आम्ही देखील त्यांच्या आनंदात सहभागी आहोत.
यामध्ये या कपलने 2 हजार डॉलरची टीप देताना शुभेच्छा संदेश देखील लिहिला आहे. यात त्यांनी आपल्या 20 वर्षांच्या सेवेसाठी आभार मानले असून उत्तम सेवेसाठी देखील आभार मानले आहेत.ही संपूर्ण टीप त्यांनी सर्व कर्मचार्यांमध्ये समान वाटण्यास देखील म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली असून अनेकांनी त्यांच्या या कृतीच कौतुक केलं आहे. एकाने माझ्या पतीबरोबर माझी पहिली डेट देखील याच लकी क्लबमध्ये झाल्याचं म्हटलं आहे तर एकाने त्यांच्या शानदार सर्विसमुळं हे काहीजणांसाठी घरासारखंच असल्याचं म्हटलं आहे.