। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटननंतर आता हैदराबादमधील भारत बायोटेकने आपली कोव्हॅक्सिन लसीची पहिली बॅच पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी देशातील विविध शहरांमध्ये पाठवली आहे. भारत बायोटेकनं दोन डोसची कोव्हॅक्सिन लस बुधवारी देशभरातील 11 शहरांमध्ये पाठवली.
सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या ङ्गकोव्हॅक्सिनफ या दोन लसींना भारत सरकारने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे शनिवारपासून सुरु होणार्या सरकारच्या सार्वजनिक लसीकरणात या दोन लसींचा वापर केला जाणार आहे. दरम्यान, आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी घोषणा केली होती, की सरकारने कोव्हॅक्सिन लसीच्या 55 लाख डोस खरेदीचा करार केला आहे. यांपैकी 16.5 लाख डोस कंपनी सरकार मोफत देणार आहे. तर उर्वरित 38.5 लाख डोस 295 रुपये प्रतिडोस याप्रमाणे सरकारला देणार आहे. या किंमतीत कराचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही.कंपनीने गनवरम, गुवाहाटी, पटना, दिल्ली, कुरुक्षेत्र, बंगळुरु, पुणे, भुवनेश्वर, जयपूर, चेन्नई आणि लखनऊ या शहरांसाठी बुधवारी पहाटे लसीची पहिली बॅच यशस्वीरित्या पाठवून दिली आहे. यातील प्रत्येक व्हायोलमध्ये 20 डोस आहेत. यांपैकी काही शहरांमध्ये ही लस पोहोचली असून, उर्वरित शहरांमध्ये बुधवारी संध्याकाळपर्यंत पोहोचणार असल्याचेही भारत बायोटेकनं सांगितलं आहे.