दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला आता थेट सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकर्यांना हटविण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. दिल्लीला लागून असलेल्या सिंघू, गाझियाबाद आणि नोएडाच्या सीमेवर शेतकर्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे. त्यात सिंघू सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकर्यांना समर्थन देण्यासाठी आज महाराष्ट्रातील शेतकरी देखील पोहोचले आहेत. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता शेतकरी आंदोलनासाठी होत असलेली गर्दी पाहून सुरक्षेच्या कारणास्तव आंदोलक शेतकर्यांना दिल्लीच्या सीमेवरुन हटविण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या दोन दिवसांत सुनावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या चर्चेतून अद्याप कोणताच तोडगा निघालेला नाही. नवे कृषी कायदे पूर्णपणे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत.