हेरगिरीच्या कथित आरोपावरून पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या माजी भारतीय नौदल कर्मचारी कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्याची इच्छा भारताचे पाकिस्तानातील उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांनी व्यक्त केली आहे.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अथर मिनल्ला व न्या. आमेर फारूक, न्या. मियांगुल हसन औरंगजेब यांच्यासमोर भारतीय उच्चायुक्तालयाचे वकील बॅरिस्टर शहानवाझ नून यांनी बाजू मांडली. त्याआधी मंगळवारी जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याच्या मुद्दयावर चर्चा झाली असून अहलुवालिया हे इस्लामाबाद उच्च न्यायालयात त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाचे निकालपत्र पाहता उत्तराकरिता वकील देणे गरजेचे आहे. न्याय्य पद्धतीने सुनावणी होणे गरजेचे आहे. जर अहलुवालिया न्यायालयासमोर येऊन बाजू मांडणार असतील तर त्याचे स्वागतच आहे असे न्या. मिनल्ला यांनी म्हटले आहे. भारतीय वकिल नून यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, उपउच्चायुक्तांनी जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याकरिता त्यांच्यावतीने भूमिका मांडण्याची तयारी दर्शवली आहे. पाकिस्तानच्या संसदीय पथकाने ऑक्टोबरमध्ये जाधव यांच्या शिक्षेचा फेरआढावा घेण्याबाबतचे विधेयक मंजूर केले असून जाधव यांच्या शिक्षेबाबत नागरी न्यायालयात फेरसुनावणी करण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले होते.