गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीचे दर सतत वाढताना दिसत आहेत. सोन्याच्या दरानं तर सध्या उच्चांकच गाठल्याचं पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात शुक्रवारी सोनाच्या किंमतीत 687 रूपयांची वाढ होऊन सोन्याचा दर 54 हजार 538 रूपये प्रति 10 ग्राम वर पोहोचला. एचडीएफसी सिक्योरिटीजनं यासंदर्भातील माहिती दिली आहे. यापूर्वी गुरूवारी कामगाजाच्या अखेरिस सोन्याचा दर 53 हजार 851 रूपये प्रति 10 ग्रामवर पोहोचला होता. तर दुसरीकडे शुक्रवारी चांदीच्या किंमतीतही मोठी वाढ पाहायला मिळाली. चांदीच्या किंमतीत 2 हजार 854 रूपयांची वाढ होऊन ती 65 हजार 910 रुपये प्रति किलोवर पोहोचली. गुरूवारी चांदीचा दर 63 हजार 056 रूपये प्रति किलो इतके होते. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात वाढ होत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यानंतर दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 687 रूपयांची वाढ झाली, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्‍लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिली. तर दुसरीकडे शुक्रवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकातही घसरण पाहायला मिळाली. तर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयची चार पैशांनी घसरण होऊन एका डॉलरची किंमत 74.84 रुपयांवर (प्राथमिक आकडेवारी) बंद झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर वाढीसह 1 हजार 976 डॉलर्स प्रति औंस आणि चांदीचा गर 24 डॉलर्स प्रति औंसवर पोहोचला आहे. सध्या करोनाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तर आर्थिक वृद्धी दरही कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सोन्याचांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत असल्याचं पटेल म्हणाले.

अवश्य वाचा