। कासा । वृत्तसंस्था ।
संपूर्ण देशभर 16 फेब्रुवारीपासून फास्टॅग प्रणालीचा वापर करणे सर्वच वाहनचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या प्रणालीत तांत्रिक गोंधळ निर्माण झाल्याने त्याचा फटका वाहनचालकांसह प्रवाशांनाही बसू लागला आहे. टोल नाक्यावर वाहनचालक आणि टोल कर्मचारी यांच्यात खटके उडत असल्याने टोलनाक्यावर वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या लांबचलांब रांगा पाहण्यास मिळत आहे.
फास्टॅग प्रणाली येण्याच्या अगोदर टोल नाक्यावर रोखीने व्यवहार होत होते. त्यामुळे रोखीचा व्यवहार करताना बराच वेळ वाया जात असे. सुटया पैशांवरून वाहनचालक आणि टोल कर्मचारी यांच्यात वाद होत असत त्यामुळे टोल नाक्यावर गर्दी होऊन वाहनचालकांचा वेळ आणि वाहनांचे इंधन दोन्ही वाया जात होते. या सर्वावर उपाय म्हणून फास्टॅग प्रणालीची यंत्रणा लागू करण्यात आली. फास्टॅगमुळे टोल नाक्यांवरील रागांमधून लवकरच मुक्ती मिळेल, असा सरकारचा दावा होता. 16 फेब्रुवारीपासून फास्टॅग वापरणे सक्तीचे केले आहे. फास्टॅग नसेल तर वाहनचालकांना टोलची दुप्पट रक्कम भरावी लागत आहे.
परंतु ही सक्ती सुरू झाल्यानंतर बुधवारी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवर मुंबईकडून गुजरातकडे जाणार्या मार्गिकेवर वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरवर रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले. हीच स्थिती देशभरातील सर्वच टोल नाक्यावर पाहायला मिळत आहे . चारोटी टोल नाक्यावर फास्टॅग स्टिकर स्कॅन न झाल्याने टोल कर्मचारी टोलची दुप्पट रक्कम भरायला सांगताना दिसत होते. त्यामुळे वाहनचालक आणि टोल कर्मचारी यांच्यामध्ये वाद होत आहेत. त्याचा परिणामा वाहतुकीवर होत आहे. वाहनांच्या रांगा लागत आहेत. या गोंधळामुळे बुधवारी टोल नाक्यावर दोन ते तीन किमी अंतरापर्यंत रांगा लागल्याचे दिसत होते. कोंडीतून बाहेर पडण्यासाठी वाहन चालकांनी आपली वाहने विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवरून चालवू लागले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.