चीनमधील शेनझेन स्थित झेनुआ डाटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड भारतातील उच्चपदस्थ नेत्यांपासून, उद्योजक आणि अन्य महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवून असल्याचे समोर आले आहे. लडाखी सीमेवर चीन बरोबर तणावाची स्थिती असताना दि इंडियन एक्स्प्रेसने या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला आहे.

आज काँग्रेसचे खासदार के.सी.वेणूगोपाल यांनी शून्य प्रहरात याबद्दल नोटीस दिली. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार शेनझेन स्थित ही तंत्रज्ञान कंपनी चीन सरकारशी संबंधित आहे. 10 हजारपेक्षा जास्त भारतीयांवर ही कंपनी पाळत ठेवून आहे. सरकारने याची दखल घेतली आहे का? आणि घेतली असेल तर काय कारवाई केली? त्याची माहिती हवी आहे असे वेणूगोपाल यांनी आपल्या नोटीशीत म्हटले आहे.

चीन सरकार आणि कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असलेल्या या कंपनीचे मुख्यालय शेन्झेन शहरात आहे. ही कंपनी केवळ महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या राजकीय नेत्यांवरच नजर ठेवून नाही, तर अनेक राजकीय संस्था आणि उद्योगांवरही ती हेरगिरी करीत आहे. राजकारण ते उद्योग आणि न्यायव्यवस्था ते माध्यम या यंत्रणांवरही ही कंपनी हेरगिरी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. इतकेच नव्हे तर भारतातील सर्व क्षेत्रांतील गुन्हेगारांचा तपशीलही या कंपनीकडे आहे.राजकीय व्यक्तींव्यतिरिक्त संरक्षणदल प्रमुख बिपिन रावत यांच्यासह 15 माजी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाई दलप्रमुख, सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, लोकपाल पी. सी. घोष, भारताचे महालेखा परीक्षक (कॅग) जी. सी. मुर्मू यांच्या हालचालींची नोंदही झेनुआ  कंपनी ठेवत असल्याची माहिती हाती आली आहे. त्याचबरोबर उद्योगपती रतन टाटा आणि गौतम अदानी यांच्यासह भारत पे या अ‍ॅपचे संस्थापक निपुण मेहरा आणि अर्थब्रिजचे अजय त्रेहान आदी नवउद्यमींवरही ही चिनी कंपनी हेरगिरी करीत असल्याचे आढळले आहे.

अवश्य वाचा