वाई 

माजी मंत्री व भारतीय कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना किसन वीर साखर कारखान्याच्या वतीने दिला जाणारा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार  आणि रुरल फौंडेशनचे प्रदीप लोखंडे यांना आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा पुरस्कार वितरण सोहळा होणार नसून पुरस्कारर्थीच्या निवासस्थानी जाऊन सन्मानपुर्वक हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली.

जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी, कारखान्याचे संस्थापक किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या स्मरणार्थ 23 वर्षांपासून आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे यंदाचे 24वे वर्ष आहे. एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्कराचे स्वरूप आहे. तसेच, समाजहिताचे कार्य करत युवा पिढीला प्रेरक ठरणार्‍या जुन्या बरोबर नव्या पिढीचाही सन्मान व्हावा या उद्देशाने आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार  सुरू करण्यात आला आहे. पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष असून 51,000 रूपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

साधी राहणीमान व पेशाने वकिल असणार्‍या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 11 वेळा विधानसभा निवडणुका जिंकुन शेतकरी कामगार पक्षाची पताका हाती घेऊन 54 वर्ष सांगोला तालुक्याचे प्रतिनिधीत्व केले. दुष्काळ, पाणी, शेती, वीज, महागाई, रोजगार हमी योजना,कापूस एकाधिकार योजना, शेती मालाचे भाव, आदी प्रश्‍नांवर त्यांनी राज्याला दिशा देण्याचे महान कार्य केले आहे. दांडगा जनसंपर्क व प्रश्‍न सोडविण्याची धमक यातूनच त्यांनी दोन सुतगिरण्या, शिक्षण संस्था उभारून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्या प्रति केलेल्या कार्याचा उचित गौरव व्हावा, या भावनेतून त्यांना हा पुरस्कार प्रदान करताना किसन वीर व्यवस्थापनास मनस्वी आनंद होत असल्याचे मदन भोसले यांनी सांगितले. तर प्रदीप लोखंडे यांनी महाराष्ट्रासह भारताच्या ग्रामीण भागात ग्रंथालयाचे जाळे उभे केले. ग्रामीण भाग संगणक साक्षर होण्यासाठी 28 हजार संगणक शाळांना पुरविले आहेत.

यापूर्वी आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार व प्रेरणा पुरस्कार राज्यातील दिग्गज मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे. प्रा. संभाजीराव पाटणे, प्रा. वसंतराव जगताप, अनिल जोशी, उपराकार लक्ष्मण माने, प्रल्हादराव चव्हाण, प्रा. रमेश डुबल आणि प्रताप देशमुख यांच्या निवड समितीने गणपतराव देशमुख, प्रदिप लोखंडे यांची पुरस्कारासाठी एकमताने केलेली शिफारस संचालक मंडळाच्या बैठकीतही एकमताने स्वीकारण्यात आल्याचे मदन भोसले यांनी सांगितले. करोनाच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार नसून दोन दिग्गजांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याचे मदन भोसले यांनी सांगितले.

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही