पंढरपूर  
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचा नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (एन.एच.ए.आय.) सोबत नुकताच पाच वर्षासाठीचा सामंजस्य करार झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
हा करार स्वेरीच्या विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांना रोड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून हायवे आणि वाहतूक क्षेत्रासंबंधातील कौशल्य वाढीस उपयुक्त ठरणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना शिकत असताना साईटवरील चालू कामांचा अनुभव घेण्याचीही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या सामंजस्य करारावर ‘नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ तर्फे पी. आय. यु.सोलापूरचे प्रोजेक्ट डायरेक्टर संजय कदम व महाविद्यालयातर्फे स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सोलापूरच्या प्रोजेक्ट कार्यालयात स्वाक्षर्‍या केल्या. यावेळी संस्थेचे विश्‍वस्त अशोक भोसले व प्रा. सुरज रोंगे तसेच सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार हे उपस्थित होते. यामध्ये पदवीच्या विद्यार्थ्यांना रु. आठ हजार तर पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना रु. पंधरा हजार स्टायफंड स्वरुपात मिळणार आहे. याशिवाय ‘नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ बरोबर झालेल्या सामंजस्य करारामुळे रस्ते व वाहतूक क्षेत्रातील नवनवीन उपक्रमांचा परिचय  होण्यासही मदत मिळणार आहे तसेच औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाच्या बाबत औद्योगिक संस्था व शैक्षणिक संस्था यामधील अंतर कमी होण्यासाठी मदत होणार आहे. 
या कराराद्वारे सुरुवातीच्या काळात सोलापूर-येडशी विभाग, सोलापूर एम.एच. अथवा के.एन.टी. सीमा विभाग व करमाळा-टेंभूर्णी विभागांमध्ये महामार्ग बांधकामांतर्गत देखभाल व प्रकल्प नियोजन या कामात स्वेरीच्या विद्यार्थी व प्राध्यापकांची ‘नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’च्या पदाधिकार्‍यांना मदत होणार आहे. स्वेरी संस्थेचे विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधक यांनी या प्रकल्पांना दिलेल्या भेटी दरम्यान तांत्रिक अभिप्रायाची अंमलबजावणी कामाच्या ठिकाणी केली जाणार आहे. त्यामुळे वरील प्रकल्पांच्या अंतर्गत गुणवत्ता व दुरुस्तीसंबंधी सुधारणा होण्यासाठी स्वेरीची मदत होणार आहे.
 
 

अवश्य वाचा

फरमानशेठ दफेदार यांचे निधन