राम मंदिर हा भारतात जसा अस्मितेचा विषय आहे, तसाच तो राजकारणाचाही विषय झाला होता. राम मंदिराच्या जागेवर बाबरी मशीद बांधली होती, हे आता पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे. मंडल आयोगाचा प्रतिवाद करण्यासाठी रामलल्लाची दारं खुली करण्यात आली, अशी टीका झाली होती. त्यांनतर राम मंदिराच्या मुद्द्यावर देशभर आंदोलन सुरू झालं. कारसेवा झाली. राम मंदिरासाठी रथयात्रा काढण्यात आली. लालकृष्ण अडवाणी यांनी हा विषय देशभर नेला. त्यातून भाजपच्या विजयाचा पाया घातला गेला. ही रथयात्रा अडवणार्‍या मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव यांची सध्या काय अवस्था आहे, हे पाहिलं आणि अडवाणी यांच्या उपस्थितीत होत असलेलं राम मंदिराचं भूमीपूजन पाहिलं, तर काव्यगत न्याय असं त्याचं वर्णन करता येईल. बाबरी मशीद पतनावरून अडवाणी, कल्याणसिंह, मुरली मनोहर जोशी यांची आता सीबीआय चौकशी सुरू असतानाच राम मंदिराची कोनशिला रचली जात आहे. गेली तीन दशकं राम मंदिराचा मुद्दा न्यायालयीन पातळीवर होता. आता सर्वोच्च न्यायालयानं राम मंदिराची जागा निश्‍चित केली. मशिदीसाठी इतरत्र जागा दिली. त्यामुळे हिंदू-मुस्लिमांमधली तेढ कमी होण्यास मदत झाली.

गेली 30 वर्षे अयोध्येत मंदिरासाठी दगडांच्या सफाईचं काम बघणारे अन्नू सोमपुरा सांगतात, आतापर्यंत काम करत असताना दोन लोकांचा मृत्यू झाला. दगडांच्या कामाशी संबंधित कारागीर आणि मजुरांचं सरासरी वय 50 ते 55 पर्यंत आहे. हे काम करताना बहुतेक लोकांना क्षयरोग किंवा फुफ्फुसांचा आजार होतो. कोरीव काम करताना बाहेर पडणारी  धूळ आणि दगडांचे लहान कण तोंडात जातात. त्यामुळे दमा, क्षयरोग किंवा फुफ्फुसांचे इतर आजार उद्भवतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कार्यशाळेत ठेवलेल्या दगडांमधली घाण काढून टाकण्याचं काम सुरू झालं. आता सात लोक हे काम करत आहेत. 23 प्रकारची रसायनं वापरली जात आहेत. सोमपुरा यांच्यासह अन्य कारागीरांनी आधी राजस्थानच्या दगडांचा अभ्यास केला आणि मग काम सुरू केलं. त्याचा अभ्यास केला नाही, तर दगडांवर रसायनांचादेखील वाईट परिणाम होऊ शकतो. विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यशाळेची जमीन अयोध्याच्या राजानं दान केली होती. राम मंदिराविषयी जनजागृती हादेखील इथल्या चर्चेचा मुद्दा आहे. इथे दगड आणि राम मंदिराची प्रतिकृतीही कोरली होती. मंदिरासाठी दगड कसे तयार केले जातात, हे इथे येणार्‍या पर्यटकांना सांगण्यात येतं. त्यांना मंदिराची प्रतिकृतीही दाखवली जाते. हे मंदिर किती मोठं असेल तेही सांगितलं जातं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता राम मंदिराचा आराखडा पूर्ण होत आला आहे. 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयानं अयोध्येतली 2.77 एकरांची वादग्रस्त जमीन रामलल्लाला देण्याचा निर्णय घेतला. मंदिरांची उभारणी आणि कामकाज यासाठी केंद्र सरकारनं एका ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टची एक बैठक नुकतीच झाली. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या माहितीनुसार, मंदिराचा आकार आता वाढवण्यात येणार आहे. मंदिराच्या पूर्वीच्या रचनेत तीन कळस होते. आता मंदिराला पाच कळस असतील. राम मंदिराचा मूळ आराखडा तयार केला होता विश्‍व हिंदू परिषदेनं; पण या मूळ आराखड्यापेक्षा आता उभं राहणारं मंदिर वेगळं असेल. मंदिराची लांबी, रुंदी आणि उंचीही विश्‍व हिंदू परिषदेच्या आराखड्यापेक्षा जास्त असेल. अशोक सिंघल यांनी विश्‍व हिंदू परिषदेचे प्रमुख असताना या राम मंदिराचा आराखडा करण्याची जबाबदारी चंद्रकांत सोमपुरा यांच्याकडे दिली होती. तेच आता या 1989 च्या मूळ आराखड्यावर आधारित नवा मंदिर आराखडा तयार करतील. आधी मंदिराच्या कळसाची गर्भगृहापासूनची उंची 128 फूट असणार होती; आता ती 161 फूट असेल. सहा फुटांच्या दगडांनी या देवळाच्या भिंती बांधण्यात येतील आणि मंदिराचा दरवाजा संगमरवरी असेल. मंदिरासाठी लागणार्‍या शिळा तासण्याचं कामही गेली अनेक वर्षे अयोध्येत सुरू आहे. त्यांचा वापरही मंदिराच्या बांधकामात करण्यात येईल. या मंदिराचा आराखडा तयार करणार्‍या चंद्रकांत सोमपुरा यांचं कुटुंब मंदिर बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. गुजरातमधल्या प्रसिद्ध सोमनाथ मंदिराच्या पुनर्उभारणीचं काम त्यांचे वडील प्रभाकर सोमपुरा यांनी केलं होतं.

सध्या लार्सन अँड टुब्रो ही कंपनी मंदिराच्या जमिनीची चाचणी करत आहे. इथली साठ मीटरच्या खोलीवरची माती कशी आहे हे तपासून मंदिराच्या पायाची आखणी केली जाईल. हे पाहणं आवश्यक आहे. कारण या मंदिराच्या बांधकामात जड दगडांचा वापर केला जाणार आहे. पावसाळा संपल्यानंतर देशभरातल्या दहा कोटी कुटुंबाशी संपर्क करून मंदिर उभारणीसाठीचे पैसे मिळवले जाणार असल्याचं राय यांनी सांगितलं. पुढच्या तीन ते साडेतीन वर्षांमध्ये हे बांधकाम पूर्ण होईल, असंही ते सांगतात. बांधकामासाठीच्या विटा सोमपुरा मार्बल्स ब्रिक्स यांच्याकडून पुरवल्या जातील. सध्या लार्सन अँड टुब्रो कंपनी माती तपासण्यासाठी नमुने गोळा करत आहे. नकाशावर आधारित पाया बांधण्याचं काम सुरू होईल. मुघल बादशाह बाबर याच्या नावानं बांधण्यात आलेली मशीद सहा डिसेंबर 1992 रोजी पाडण्यात आली. तीन दशकं उलटून गेले तरी ती कुणी पाडली यावरून न्यायालयात वाद सुरू आहे. अयोध्या जिल्ह्यातल्या सोहवाल तालुक्यात धन्नीपूर नावाच्या गावात योगी आदित्यनाथ सरकारनं पाच एकर जागा बाबरी मशिदीसाठी देऊ केली आहे. उत्तर प्रदेशमधल्या सुन्नी वक्फ बोर्डानं आपण ही जागा स्वीकारत असल्याचं म्हटलं असलं तरी इतर काही मुस्लिम संघटनांनी या जागेवर आक्षेप घेतला आहे. अयोध्येमध्ये बाबरी मशिदीच्या जमिनीसाठी मालकी हक्काची लढाई लढणार्‍यांमधले एक प्रमुख पक्षकार हाजी महबूब यांनी या जागेवर आक्षेप घेतला आहे. अयोध्येतच आणि शहरातच जमीन देण्याची त्यांची मागणी आहे. अयोध्येतला राम हा हिंदूंसाठी श्रद्धेचा विषय असला तरी राजकारणात वादाचा विषय झाला होता. या मंदिर-मशीद राजकारणामुळे 80 आणि 90 च्या दशकात मोठी राजकीय उलथापालथ झाली. राम मंदिराच्या उभारणीचा अपेक्षित कालावधी जाहीर करण्यात आल्यानंतर नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली. कारण, तीन ते साडेतीन वर्षांमध्ये मंदिराचं काम पूर्ण होईल, असं सांगितलं जातं आहे. म्हणजेच 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या जवळपास सहा महिने आधी राममंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं असेल, असं भाजपच्या सध्याच्या अजेंड्यावरून लक्षात येतं. लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा भाजपला नक्कीच उपयोगी पडेल. आर्थिक विषय महत्त्वाचे असले तरी भावनिक मुद्दे निवडणुकीत अधिक प्रभावी ठरतात. त्या दृष्टिकोनातूनही हा विषय महत्वाचा ठरतो. केंद्र सरकारने गेल्या वर्षी पाच ऑगस्टला घटनेचं कलम 370 हटवत काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा संपुष्टात आणला होता. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना राम मंदिराचं भूमीजन होतं आहे. याचे राजकीय पडसाद काय उमटतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येला भेट देऊन राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतल्या खासदार आणि आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीला श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी आणि स्थानिक प्रशासनातले अधिकारीही उपस्थित होते. जगाला अपेक्षित असलेली सुंदर अयोध्या स्वंयशिस्तीनं उभारण्याची क्षमता आपल्यात आहे. राम मंदिराच्या निमित्तानं ही संधी आपल्याला मिळाली आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. मंदिर बांधकामाच्या भूमीपूजन प्रसंगी अयोध्येत दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अयोध्येतलं प्रत्येक घर चार आणि पाच ऑगस्टला दिव्यांनी उजळून निघेल. दीपावलीचा उत्सव हा अयोध्येशी संबंधित आहे. अयोध्येचं नाव जुळल्याशिवाय दीपावली होऊ शकत नाही. राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर तीन ऑगस्टपासून अयोध्येत तीन दिवसांचा वैदिक विधीही आयोजित करण्यात आला आहे. प्रत्यक्ष भूमिपूजनाच्या वेळी अयोध्येत सर्वत्र मोठमोठे पडदे उभारुन हा सोहळा दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक भाविकांना हा कार्यक्रम पाहता येणार आहे.

 

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही