ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 विश्‍वचषक पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्याचा आला आहे. या निर्णयामुळे आयपीएलच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला असून हे सामने संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. आयपीएल होण्याच्या आशा पल्लवीत झाल्यामुळे बीसीसीआयचं नुकसान काही प्रमाणात कमी होऊ शकेल. मात्र, टी-20 विश्‍वचषक पुढे ढकलल्यामुळे क्रिकेट बोर्डांचं आर्थिक गणित बिघडू शकतं.

क्रीडाक्षेत्राला कोरोना विषाणूच्या प्रकोपाचा मोठा फटका बसला. अनेक महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात किंवा पुढे ढकलण्यात आल्या. ऑलिम्पिकसारखी जागतिक स्तरावरची स्पर्धा वर्षभरासाठी पुढे गेली. यंदाचं विम्बल्डन रद्द झालं. क्रिकेटची आशिया चषक स्पर्धाही रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तिकडे ऑस्ट्रेलियामध्ये होणार्‍या टी-20 विश्‍वचषकाबाबत आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. असंख्य नियम, अटी, बंद असणारी विमान वाहतूक या सर्व पार्श्‍वभूमीवर विश्‍वचषक पुढे ढकलावा, असाच मतप्रवाह होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियालाही हेच हवं होतं आणि अखेर आयसीसीने टी-20 विश्‍वचषक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यामुळे अर्थातच  आयपीएलच्या आयोजनाचा मार्ग खुला झाला. बीसीसीआयला यंदा ही स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत आयोजित करायचीच होती. हा त्यांचा अट्टाहासच होता. यंदा आयपीएल होणारच, असं बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही म्हटलं होतं. भारतात आयपीएल खेळवता आली नाही तर अखेरचा पर्याय म्हणून परदेशात स्पर्धेचं आयोजन केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार संयुक्त अरब अमिरातीत स्पर्धेचं आयोजन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. टी-20 विश्‍वचषक पुढे ढकलण्याचा निर्णय झाला की आयपीएलची तयारी सुरू करायची, असं बीसीसीआयने ठरवलं होतं. सध्याची परिस्थिती बघता विश्‍वचषक पुढे ढकलला जाणार, हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नव्हती. आयसीसीने ही घोषणा केली आणि बीसीसीआयने सुटकेचा निश्‍वास टाकला.

अर्थात आयपीएलच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी वाटतो तितका सोपा नाही. मुळात आयपीएलचं आयोजन भारतात करायचं का परदेशात याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सप्टेंबरपर्यंत परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असं आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी म्हटलं आहे. अमिरात क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेच्या आयोजनाची तयारी दाखवली आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डानेही यात रस घेतला असला तरी ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत होण्याची शक्यता अधिक आहे. 26 सप्टेंबर ते आठ नोव्हेंबरदरम्यान आयपीएलचं आयोजन होऊ शकतं. गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट बंद असल्यामुळे तसंच देशभरातल्या टाळेबंदीमुळे खेळाडूंना सरावासाठी मैदानंच उपलब्ध झालेली नाहीत. आयपीएलमध्ये उतरण्याआधी खेळाडूंना किमान तीन ते चार आठवड्यांचा सराव आवश्यक आहे. आयपीएल संघ मालकांचंही हेच म्हणणं आहे. आयपीएलनंतर भारतीय संघ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार असल्यामुळे चेतश्‍वर पुजारा, हनुमा विहारीसारख्या आयपीएलमध्ये न खेळणार्‍या खेळाडूंच्या सरावाची सोय करावी लागणार आहे. आयपीएलच्या काळात अहमदाबाद येथील मोटेरा मैदानात अत्यंत सुरक्षित वातावरणात हे खेळाडू सराव करणार असल्याचं कळतंय.

यंदा मैदानातल्या कॉमेंट्री बॉक्समधून नाही तर घरात बसून समालोचन करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा अत्यंत सुरक्षित आणि स्वस्त असा पर्याय आहे. सुनिल गावस्कर यांच्यासारखे सत्तरी ओलांडलेले खेळाडू समालोचन करणार असल्यामुळे घरी बसून समालोचन करणं अधिक संयुक्तिक ठरू शकतं. मात्र याबाबतचा निर्णय स्टार स्पोर्टसच घेऊ शकेल. दक्षिण आफ्रिकेतल्या थ्री टीसी स्पर्धेदरम्यान हा प्रयोग करण्यात आला होता. यावेळी आकाश चोप्रा, दीप दासगुप्ता, इरफान पठाण यांनी घरातूनच समालोचन केलं होतं.  गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांनी क्रिकेट सामन्यांचा आनंद घेतलेला नाही. त्यातच टी-20 विश्‍वचषक एक वर्ष पुढे ढकलण्यात आल्यामुळे क्रिकेटचाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला. कोरोनामुळे निर्माण झालेला ताण चुरशीच्या सामन्यांमुळे काही काळ का होईना, कमी होऊ शकतो. मात्र कोरोनाकाळातल्या आर्थिक मंदीमुळे बरेच उद्योग डबघाईला आलेले असताना प्रायोजक मिळवण्याचं मोठं आव्हान संघमालक आणि प्रसारण करणार्‍या वाहिनीपुढे असेल.

दरम्यान, बीसीसीआयने ठरवलेल्या आयपीएलच्या तारखांवर सामन्यांचं प्रसारण करणारी वाहिनी नाराज असल्याचं कळतंय.  स्पर्धा आठवडाभर पुढे ढकलण्यात यावी असं या वाहिनीचं म्हणणं आहे. अंतिम सामना आठ नोव्हेंबरला खेळवण्याऐवजी दिवाळीच्या मुहुर्तावर म्हणजे 14 नोव्हेंबरला खेळवण्यात यावा, असा वाहिनीचा आग्रह आहे; जेणेकरून सणासुदीच्या काळात जाहिरातीच्या माध्यमातून अधिक महसूल मिळवता येऊ शकेल. गेल्या काही महिन्यांपासून खेळांचं थेट प्रसारण होत नसल्यामुळे क्रीडा वाहिन्यांना बरंच आर्थिक नुकसान सोसावं लागलं आहे. त्यातच आता टी-20 विश्‍वचषक पुढे गेल्यामुळे तोटा होणार आहे. आयपीएलच्या निमित्ताने हे नुकसान भरून काढण्याचं वाहिनीचं उद्दिष्ट आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा पहिला कसोटी सामना चार डिसेंबरपासून सुरू होईल. त्यामुळे आठ नोव्हेंबरला आयपीएल आटोपल्यास  10 नोव्हेंबरला संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी रवाना होऊ शकेल आणि पुढचे सामने वेळेत खेळवता येतील. ऑस्ट्रेलियामध्ये दिवस-रात्र कसोटी सामना खेळायचा असल्याने असा एखादा सराव सामना खेळवला जाऊ शकतो. यासाठीही वेळ हवा आहे. त्यामुळे बीसीसीआयपुढे पेच निर्माण झाला आहे. याबाबत तोडगा काढावा लागणार आहे. यंदा आयपीएलचं आयोजन झालं नसतं तर बीसीसीआयला 40 अब्ज रुपयांपेक्षा अधिक नुकसान झालं असतं. प्रायोजकांकडून मिळणार्‍या महसुलावर पाणी सोडावं लागलं असतं. हे होऊ नये म्हणून कोणत्याही परिस्थितीत आयपीएलचं आयोजन करण्याचा चंगच बीसीसीआयने बांधला होता आणि आता आयोजनातले अडथळे दूर झाले आहेत, असं म्हणायला हरकत नाही. तिकडे टी-20 विश्‍वचषक पुढे ढकलल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियालाही दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे रिकाम्या मैदानांमध्ये स्पर्धा खेळवण्याची वेळ आली असती तर बोर्डाला बरंच नुकसान सोसावं लागलं असतं. शिवाय सहभागी संघांना ऑस्ट्रेलियात आणणं, 14 दिवसांच्या विलगीकरणात ठेवणं हे सगळं आव्हानात्मकच होतं.  2021 नंतर 2022 मध्ये पुन्हा टी-20 विश्‍वचषक होणार आहे. तसंच 2023 मध्ये भारतात एकदिवसीय विश्‍वचषकाचं आयोजन होणार आहे. सलग दोन विश्‍वचषकांच्या आयोजनाबाबत बीसीसीआय अनुत्सुक आहे. त्यामुळे पुढील वर्षीचा विश्‍वचषक भारतात होऊन 2022 चा ऑस्ट्रेलियात होऊ शकतो. मात्र सध्या तरी सगळ्या शक्यताच व्यक्त केल्या जात आहेत.  त्यातच ही स्पर्धा रद्द झाल्याने तसंच गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट बंद असल्यामुळे आयसीसीकडून आर्थिक मदत मिळेल का, हा प्रश्‍न विविध देशांच्या क्रिकेट बोर्डांना पडला आहे.

बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड अशा मोजक्या क्रिकेट संघटना सोडल्यास इतर देश आयसीसीकडून मिळणार्‍या आर्थिक मदतीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. आयसीसी वर्षातून दोन वेळा आर्थिक मदत देते. जुलै महिन्यापर्यंतच्या आर्थिक मदतीवर या निर्णयाचा परिणाम होणार नसल्याचं कळतंय. पण पुढील वर्षी जानेवारी महिन्यात आर्थिक मदत  दिली जाईल किंवा नाही याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. वेस्ट इंडिजच्या इंग्लंड दौर्‍यापासून क्रिकेट पुन्हा सुरू झालं. भारताचा ऑस्ट्रेलिया दौराही होणार आहे. त्यातच आता आयपीएलचं आयोजनही जवळपास निश्‍चित असल्यामुळे मधला काही काळ शांत गेला असला तरी पुढच्या काही महिन्यांमध्ये चाहत्यांना क्रिकेटची मेजवानी मिळणार आहे. यासाठी क्रिकेटचाहतेही मरगळ झटकून तयार असतील यात शंका नाही.

 

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन