रायगड जिल्हा डोंगर, दर्‍या व खोर्‍यांनी बनलेला आहे. पश्‍चिमेस अरबी सागर, पूर्वेस सह्यागिरीची शिखरे असून, हा जिल्हा लांबोळका आहे. येथे 3500 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडूनही उताराच्या भूपृष्ठामुळे पाणी सागराकडे झर्रकन वाहून जाते व काही वेळातच भूपृष्ठ कोरडे पडते, असा या जिल्ह्याचा भूगोल आहे. या जिल्ह्याचा इतिहासही ज्वलंत आहे. काटकपणा, चिवटपणा व निर्भीडपणा येथील माणसात असल्यामुळे या जिल्ह्याने इतिहास घडवला आहे.  शिवछत्रपतींच्या रायगड किल्ल्यावरील  राजधानीमुळे आणि सरखेल कान्होजी राजांच्या कुलाबा किल्ल्यावरील अलिबाग येथील राजधानीमुळे या जिल्ह्याच्या दगडा -दगडात इतिहास भिनलेला आहे. म्हणून या जिल्ह्यात हिमालयाची उंची गाठणारी नररत्ने जन्मली. त्यांचे कर्तृत्व महाराष्टापुरते मर्यादित न राहता देशव्यापी ठरले. यात राजकीय नेते, क्रांतिकारक, समाजधुरीण, शिक्षकतज्ज्ञ, महामहोपाध्याय व प्राध्यापक दत्तो वामन पोतदार यांचाही समावेश होतो. ते महाड तालुक्यातील बिरवाडीचे सुपुत्र. त्यांचा जन्म बिरवाडी येथे 5 ऑगस्ट 1890 रोजी झाला. त्यांची 130 वी  जयंती आज 5 ऑगस्ट 2020 रोजी विविध उपक्रमांनी साजरी होत आहे.  

संस्कृततज्ज्ञ, विविध भाषांवर प्रभुत्व असलेले, फर्डे वक्ते, अमोघ वाणी, तल्लख बुद्धी, हजरजबाबी, गळ्यापासून खाली ओळीने बटणे असलेला लांब शेरवानी कोट, दोन्ही खांद्यांवरून पुढील बाजूस नीटनेटकेपणाने आलेले उपरण्याचे पदर, विशाल व भव्य कपाळावरील गंधरेखा आणि चेहर्‍यावरील सदोदित वावरणारी प्रसन्नता असलेले प्रा. पोतदार विविध क्षेत्रातील कामांमुळे अखिल महाराष्ट्रास सुपरिचित आहेत.

द.वा. पोतदार यांचा जन्म महाड तालुक्यातील बिरवाडी येथे 5 ऑगस्ट 1890 रोजी झाला. त्यांचे मूळ आडनाव ओरपे होते. पण, त्यांचे पूर्वज आदिलशाहीमध्ये पोतदार-खजिना रक्षक या पदावर काम करत होते. त्या ठिकाणी कार्यक्षमतेने आणि प्रामाणिकपणाने काम केल्यामुळे पोतदार हे नाव सर्वतोमुखी झाले. शेवटी ओरपे हे आडनाव मागे पडून ङ्गपोतदारफ हेच नाव पुढे आले. अगाध बुद्धिमत्ता लाभलेल्या दत्तो वामन यांचे शिक्षण पुणे येथील नु.म.वि. (नूतन महाराष्ट्र विद्यालय) या नामवंत शाळेत, तसेच महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. पदवी परीक्षेपर्यंत त्यांनी प्रथम क्रमांक सोडला नाही. वाक्स्पर्धेतही ते चमकले. मातृभाषा म्हणून मराठी भाषेवर त्यांचे नितांत प्रेम, तसेच प्रभुत्वही होते. राष्ट्रभाषा म्हणून हिंदी, जागतिक भाषा म्हणून इंग्रजी व अनेक भाषांची जननी म्हणून संस्कृत भाषेवरही त्यांची मदार होती. वाचनाचा छंद व ज्ञानलालसा वृत्तीमुळे विविध भाषांची खोली ते वाढवू शकले. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाची उंची वाढली. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. पण, सत्य व वास्तव इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष होता. या सर्व बाबी पोतदारांकडे असल्यामुळे त्यांनी विविध देशांच्या इतिहासाचे सखोल वाचन केले. ऐतिहासिक पुरावेही शोधले. त्यांचा त्यांनी अध्यापनात वापर केला. ते पुणे येथील पूना कॉलेज-विद्यमान सर परशुराम भाऊ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असताना जगाचा वास्तव इतिहास विद्यार्थ्यांसमोर ठेवीत. विविध पुरावे देत. पुराणकालीन वस्तू किल्ले, राजवाडे, अन्य इमारती यांना भेट देऊन संबंधितांशी चर्चा करीत, वास्तववादी इतिहास समोर ठेवीत असल्यामुळे ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक झाले.

संयुक्त महाराष्ट्राचे पाईक    

वस्तुस्थितीवर आधारित, टीका-टिप्पणीविरहित व पुराणकालीन दाखल्याची जोड असलेला तसेच धर्मा-धर्मातील तेढ दूर करणारा इतिहास समाजासमोर यावा आणि इतिहास विषयाबाबत प्रेम वाढवण्यासाठी त्यांनी आधुनिक इतिहास भारतीय परिषदेची (मॉडर्न इंडियन हिस्ट्री कॉन्फरन्स) स्थापना केली. पुणे व दिल्ली येथे या परिषदेची अधिवेशने भरवली. मराठे व मुघलांबाबतच्या गाढ्या अभ्यासाने त्यांना चांगली साथ दिली. त्यांच्या या कार्याची नोंद भारत सरकारने घेतली आणि इतिहास विषयाच्या या तौलनिक अभ्यासकास भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोगाचे सन्माननीय सदस्यत्व बहाल केले.

भारतीय इतिहास संशोधन मंडळाचे चिटणीस पद व त्यांनतर कार्याध्यक्ष पदही त्यांनी भूषविले. मातृभाषा म्हणून मराठीवर त्यांचे मातृवत प्रेम होते. प्रत्येक विद्यार्थ्यास मातृभाषेतून शिक्षण मिळावे असा त्यांचा आग्रह होता. धर्मापेक्षा मातृभाषेने अधिक जवळीकता साधता येते, हा त्यांचा अनुभव होता. मराठी भाषिकांचा महाराष्ट्र प्रांत निर्माण व्हावा. मराठी भाषेला राज्य भाषेचा दर्जा मिळावा. मुंबई हे जागतिक शहर महाराष्ट्राची राजधानी व्हावी राज्याचा सर्व व्यवहार मराठीतून चालावा यासाठी ते सक्रिय झाले. सभासंमेलने, चर्चासत्र यांच्यामार्फत ते लोकप्रबोधन करू लागले. 1955-56 सालच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते सहभागी झाले. आचार्य अत्रे, कॉ. एस.ए. डांगे, कॉ. मिरजकर एस.एम. जोशी इत्यादींनी उभारलेल्या लढ्यात ते अग्रभागी होते. न्याय्य हक्कांसाठी व्याख्यानांची सरबत्ती सुरु झाली. प्रा. पोतदार यांना संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे उपाध्यक्षपद बहाल करण्यात आले. वृत्तपत्रांनीही या चळवळीस पाठिंबा दिला. साहित्यिकही सहभागी झाले. राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला. संयुक्त महाराष्ट्रसाठी राजीनामा सत्र सुरु झाले. तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री डॉ. सी.डी. देशमुख यांनीही मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे वातावरण फारच तापले. 1957 च्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस विरोधकांनी आघाडी निर्माण करून संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली व त्या समितीमार्फत निवडणुका लढवल्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण कराड विधानसभा मतदारसंघातून निसटत्या बहुमताने विजयी झाले. त्या वेळच्या मुंबई राज्यात काँग्रेस जेमतेम मंत्रिमंडळ बनवू शकली. काँग्रेस पक्षावर आलेले गंडांतर टाळण्यासाठी व मराठी भाषिकांची अस्मिता जपण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंना संयुक्त महाराष्ट चळवळीस हिरवा कंदील दाखवावा लागला. त्यामुळे 1 मे 1960 ला महाराष्ट्र प्रांताची निर्मिती झाली. मराठी ही राज्यभाषा बनली व मुंबई राजधानी झाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले.

प्रा. पोतदार इतिहासाचे गाढे अभ्यासक होते. मराठी भाषेबरोबरच हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषांवर प्रभुत्व होते. अफाट वाचन होते. डोळसपणे प्रवास करण्याची जिद्द होती. लिहिण्याचीही सवय होती. म्हणून त्यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले. अनेक ग्रंथ लिहिले. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. भारतातील अनेक विद्वानांपैकी ते एक विद्वान होते. महामहोपाध्याय ही पदवी देऊन त्यांना शासनाने गौरविले होते. वाराणसी विद्यापीठाकडून तसेच पुणे विद्यापीठाकडून त्यांना साहित्य वाचस्पती (डी.लिट.) ही पदवी सन्मानपूर्वक दिली गेली. पुणे विद्यापीठ तसे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकुलगुरूपदही त्यांनी भूषविले. 1961 साली सुरु झालेले अलिबाग येथील जे. एस.एम. कॉलेज रायगड जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय आहे. रायगड जिल्हा पूर्वी पुणे विद्यापीठाशी संलग्न होता, त्यामुळे प्रा. पोतदार पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू या नात्याने जे.एस.एम. विद्यापीठाच्या उद्घाटनास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे.एस.एम. कॉलेजचे तत्कालीन कार्याध्यक्ष तथा मुंबई राज्याच्या विधानसभेचे माजी सभापती नानासाहेब कुंटे होते.

प्रा. पोतदार  इतिहासाचे  व शिवछत्रपतींचे गाढे अभ्यासक होते. शिवछत्रपतींचा वास्तव इतिहास समाजासमोर येण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिवचरित्र लेखनाची जबाबदारी दत्तो वामनांवर टाकली. ही जबाबदारी ते पूर्णत्वास नेत होते; परंतु नियतीच्या मनात वेगळेच असल्यामुळे हे चरित्रलेखन पूर्ण करण्यापूर्वीच 6 ऑक्टोबर 1979 रोजी त्यांना इहलोक सोडून जावे लागले. मराठी भाषा शुद्ध लिहिणे, शुद्ध वाचणे व या भाषेचा वापर शासकीय स्तरावर करणे, हीच पोतदार यांना श्रद्धांजली ठरेल.

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही