Saturday, December 05, 2020 | 11:56 AM

संपादकीय

गुंतवणुकीसाठी स्पर्धा

महाराष्ट्रातील गुंतवणूक आपल्या राज्यात यावी यासाठी यापूर्वी स्पर्धेत असलेल्या...

ऐतिहासिक सत्तांतर
08-Nov-2020 06:51 PM

जगातील एक महत्त्वाची आर्थिक ताकद असलेल्या अमेरिकेत लोकशाही मार्गाने अखेर अपेक्षित असे सत्तांतर झालेच. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव अजूनही मान्य केलेला नाही. त्यावरुन ट्रम्प महाशय किती अपरिपक्व नेते होते ते दिसते. अशा या नेत्याच्या मागे आपले पंतप्रधान नरेंद्र  मोदी किती आहारी गेले होते हे देखील पहायला मिळाले होते. अमेरिकेच्या इतिहासात ही निवडणूक बर्‍याच दृष्टीने पाहता ऐतिहासिक ठरली आणि सत्तांतरही ऐतिहासिक ठरले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पराभूत झालेल्या उमेदवाराने आपला पराभव न स्वीकारण्याची लोकशाही असलेल्या देशातील ही पहिलीच घटना ठरावी. त्याहून महत्त्वाची घटना म्हणजे भारतीय वंशांच्या व डाव्या विचारांकडे झुकलेल्या कमला हॅरिस यांची उपराष्ट्राध्यपदी निवड झाली. अमेरिकेतील या पदावर विराजमान होणार्‍या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. भविष्यात भारत अमेरिका संबंध अधिक दृढ होण्यासाठी हॅरिस यांची मोठी मदत होईल  यात काही शंका नाही. डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेले जो बायडेन यांनी आपल्या संयमी स्वभावाने ही निवडणूक अखेर जिंकलीच व आता ते ट्रम्प यांनी कितीही विरोध केला तरी अध्यक्षपदी बसणार आहेत. ट्रम्प यांनी विविध प्रश्‍नी जो अतिरेक केला होता त्याचा अमेरिकनांना विट आला होता, असेच हा पराभव सांगतो. एकीकडे उग्र, तोंडाळ व आक्रस्ताळपणे केलेला ट्रम्प यांचा प्रचार तर दुसरीकडे बायडेन यांनी शांत परंतु निश्‍चयाने अमेरिकन लोकांचे प्रश्‍न मांडून त्याचा केलेला उहापोह जनतेला भावला आहे. बायडेन हे बराक ओबामा यांच्या बरोबरीने उपाध्यक्ष झाले होते. त्यामुळे त्यांचा प्रशासकीय कामातील अनुभव मोठा आहे. उपाध्यक्ष असताना त्यांनी आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी केलेले प्रयत्न व स्वस्त वैद्यकीय उपचार देण्यासाठी केलेले उपाय यामुळे प्रत्येक अमेरिकनांच्या मनात मोठी आदराची भावना होतीच.

मावळते अध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेतील मोठ्या संख्येने असलेली भारतीय वंशांच्या नागरिकांची मते खेचण्यासाठी मोदी यांना सोबत घेऊन भारतात व अमेरिकेत मोठे कार्यक्रम केले होते. मोदी यांनीही या उत्साहाच्या भरात ट्रम्प यांचा प्रचारही केला होता. परंतु त्यावर मात करण्यासाठी बायडेन यांनी भारतीय वंशाच्या कमला यांना उपाध्याक्षपदाची जागा दिली होती. त्यामुळे मोदी यांच्यामागे शंभर टक्के भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत असे नव्हे हे सिद्द झाले आहे. आज कोरोनाने अमेरिकेत धुमाकूळ घातलेला असताना पुन्हा नव्याने अमेरिका उभी करावी लागणार आहे. त्यासाठी ट्रम्प यांच्याऐवजी बायडेन यांच्यासारखे जाणते व संयमी नेतृत्व अमेरिकेला लागेल हे जनतेने ओळखले. माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या सोबतीने त्यांनी काम केलेले असल्याने त्यांना जनतेच्या हिताच्या दृष्टीने कशी पावले टाकता येतील याची नक्की जाण आहे. तर कमला हॅरिस यांच्या आई डॉ. श्यामला गोपालन या भारतीय तामीळ तर वडिल डॉ. डोनाल्ड हॅरिस हे जमैकाचे. त्यांची आई डॉक्टर तर वडिल अर्थशास्त्राचे अभ्यासक. त्यांची अमेरिकेत मैत्री झाली व त्यांनी लग्न केले. कमला यांचे भारतीयत्त्वाचे नाते आता भविष्यात भारताच्या कसे फायदेशीर ठरते ते पहावे लागेल. ट्रम्प यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात घेतलेले अनेक निर्णय त्यांना भोवले आहेत. मुळातच त्यांच्या निवडणुकीच्या विजयात रशियाचा हात असल्याच्या गुप्तहेर खात्याचा दावा त्यांना खोडून काढता आला नाही. कोरोनाच्या काळात ट्रम्प यांनी घेतलेली धोरणे व भूमिका अमेरिकन जनतेस काही पसंत पडली नव्हती. त्यांनी जनतेला काहीसे वार्‍यावर सोडल्यासारखेच केले होते. त्यातच कोरोनाची बाधा होणे हा देवाचा आशिर्वाद असे वक्तव्य करुन ट्रम्प यांनी आपल्यावर वाद ओढावून घेतला होता. कोरोनामुळे अमेरिकेत लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत.

त्यामुळे एच. वन बी व्हिसावर 2020 पर्यत बंदी घालण्याची केलेली घोषणा त्यांच्याच आंगलटी आली. त्याचबरोबर कृष्णवर्णिय जॉर्ज फ्लॉइड याचा झालेला पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूनंतर संपूर्ण अमेरिकेभर तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी दिलेली टोकाची प्रतिक्रिया जनतेला काही भावली नव्हती. मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचा घेतलेला निर्णय व मेस्किको सीमा पार करणार्‍या मुलांना त्यांच्या पालकांपासून वेगळे ठेवण्याचा घेतलेला निर्णयही वादग्रस्त ठरला होता. एकूणच ट्रम्प यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले त्यामुळे त्यांना पुढील चार वर्षे सत्ता करण्याची संधी न देताच अमेरिकी जनतेने घरी बसविले. अमेरिकेत बदल होणार याची चाहून गेले वर्षभर लागली होतीच. कदाचित ट्रम्प यांनाही त्याची माहिती असावी. कारण त्यांनी आपण न्यायालयात आव्हान देऊ, अध्यक्षपद सोडणार नाही अशी टोकाची वक्तव्ये केली होती. त्यामुळे अमेरिकन लोकशाहीचा झालेला अपमान जनतेला काही पसंत नव्हता. या बदलानंतर भारत-अमेरिका संबंध कसे राहतील हा कळीचा मुद्दा राहिला आहे. एक बाब लक्षात घेतली पाहिजे की अमेरिकेत कोणीही म्हणजे डेमॉक्रॉटीक असो किंवा रिपब्लिक पक्षाचा अध्यक्ष सत्तेवर आला तरी ते प्रथम आपले आर्थिक हितसंबंध कसे जपता येईल याचा विचार करतात. आता भारताची अमेरिकेला गरज तर आहेच तसेच अमेरिकेलाही तेवढीच मदत अपेक्षित आहे. भारतीय वंशांच्या नागरिकांची असलेली मोठी संख्या व भारताने आता स्वीकारलेले मुक्त आर्थिक धोरण अमेरिकन भांडवलशाहीला पोषक आहे. त्यामुळे ट्रम्प जाओ किंवा बायडेन येवो उभय देशांची मैत्री ही वाढतच जाणार आहे. आता भारतीय उपखंडाबाबत प्रामुख्याने चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांच्या बाबतीत नवे प्रशासन कोणती भूमिका घेते हे पहाणे भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.अमेरिकेतील सत्तांतर हे आता जागतिक पातळीवरील विविध देशातील सत्तांतराची नांदी ठरणार का हे देखील आपल्याला भविष्यात पहावे लागेल. तसे झालेच तर जगातील बदलाची सुरुवात झालेला हा निकाल होता, अशी इतिहासात अमेरिकेतील या सत्तांत्तराची नोंद होईल.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top