दिघी

परतीचा पाऊस व वादळी संकटाने श्रीवर्धन तालुक्यातील शेतकर्‍याचे झालेले अतोनात नुकसान व त्यामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाच्या निर्देशाने श्रीवर्धन प्रशासनाकडून तातडीने भातशेतीचे पंचनामे करण्यात आले. वेळेत मदत मिळण्याच्या प्रतीक्षेत असणार्‍या 520 शेतकर्‍यांना अद्याप मदत मिळाली नाही.

श्रीवर्धन तालुक्यातील 2019 मधील ऑक्टोबरपासून भात पिके काढणीवेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे भात उत्पादक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तयार झालेले भातपीक पुर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून, कृषी व महसूल विभागाने 1,928 शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामेदेखील केले; मात्र आजतागायत तालुक्यातील सुमारे 520 शेतकरी शासकीय नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.    

अतिवृष्टीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांकडून ऑक्टोबरपासून शेतीचे पंचनामे करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील एकूण पिका खालील क्षेत्र 1324 हेक्टर भात व 130. 50 हेक्टर नाचणीचे पीक आहे. अतिवृष्टीमुळे यामधील बाधित क्षेत्र 542.30 हेक्टर असल्याची माहिती मागील नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत श्रीवर्धन तालुका प्रशासनाने दिली होती. त्यावेळी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची संख्या 1465 होती. नंतर अंतिम टप्प्यातील पंचनामे 1369 शेतकर्‍यांचे करण्यात आले. यामध्ये जमीन क्षेत्र 458. 74 हेक्टर  इतकी आहे. कापणी करून नुकसान झालेली जमीन 921 शेतकर्‍यांची आहे. त्याचे क्षेत्र 323. 70 हेक्टर आहे. व उभ्या पिकाचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची संख्या 448 व क्षेत्र 135. 04 हेक्टर नोंद करण्यात आली. शेवटी शेतीचे पूर्ण पंचनामे झाल्यानुसार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची संख्या 1,928 नोंदविण्यात आली.

श्रीवर्धन महसूल विभागाकडून या कालावधीत पंचनामे झाल्यानुसार अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे भातपीक व नाचणीचे पीक नुकसानीपोटी 1,928 शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी श्रीवर्धन तालुक्याला जवळ  जवळ पन्नास लाख अनुदान प्रस्ताव करण्यात आला. यातील 1,408 नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना 38 लाख 97 हजार 672  रुपये प्राप्त अनुदान वाटप करण्यात आला आहे. नुकसान भरपाई पासून सद्या वंचित 520 शेतकर्यांच्या खात्यात अद्यापही रक्कम जमा झाली नाही. पिकाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी आम्हाला अजून किती काळ वाट बघावी लागणार आहे. असा प्रश्‍न नुकसानग्रस्त शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात असून वेळेत मदत मिळावी अशी मागणी येथील शेतकरी करत आहे.  

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.