मुंबई


नोव्हेंबरमध्ये सत्ता स्थापनेसाठी शह-काटशहाचा खेळ सुरू असताना राज्यात मात्र 300 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून गेल्या चार वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत एका महिन्यात शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्याचा हा आकडा सर्वाधिक असल्याचंही स्पष्ट झालं आहे. यापूर्वी 2015मध्ये महिन्याभरात 300हून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं होतं.
राज्याच्या महसूल विभागाच्या आकडेवारीतून शेतकर्‍यांच्या आत्महत्येची ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यात ऑक्टोबरमध्ये आत्महत्येच्या घटनांचं प्रमाण वाढल्याचंही दिसून आलं आहे. अवकाळी पावसामुळे 70 टक्के खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. यापूर्वी 2015मध्ये राज्यात 300 हून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर गेल्या वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण 61 टक्क्यांनी वाढल्याचंही महसूल विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.
सातत्याने दुष्काळाचा सामना करणार्‍या एकट्या मराठवाड्यात नोव्हेंबरमध्ये 120 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून त्यापाठोपाठ विदर्भात 112 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यात 2019मध्ये एकूण 2532 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर 2018मध्ये हा आकडा 2518 इतका होता. अवकाळी पावसामुळे राज्यातील एक कोटी लोकांना फटका बसला असून त्यात मराठवाड्यातील 44 लाख शेतकर्‍यांचा समावेश असल्याचं या आकडेवारीत नमूद केलं आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसाना झालेल्या शेतकर्‍यांना आतापर्यंत 6552 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आल्याचं प्रशासकीय अधिकार्‍यांचं म्हणणं आहे. तर राज्य सरकारने शेतकर्‍यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी दिल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.