पोलादपूर

तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत पोलादपूर शहरानजीकच्या सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीत वसलेल्या दुर्गम खेडेगाव सडवली येथे चक्क प्राथमिक शाळेतील विद्यार्थी खाजगी इंग्लिश मिडीयम शाळांना लाजवतील अशा उच्च दर्जाचे शिक्षण तेथील प्रयोगशील मुख्याध्यापक सुनील पवार यांच्यामुळे घेत आहेत. या मुख्याध्यापकांनी चक्क गुगल प्ले स्टोअरवरून मोफत डाऊनलोड करून ऑफलाईन वापरता येण्यासारखी पाच मोबाईल ऍप्स तयार केली आहेत आणि युटयूबवर माझी मराठी शाळा हे चॅनेल सुरू करून अवघ्या मराठी प्राथमिक शैक्षणिक जगताचे लक्ष वेधून घेतले आहे.

सडवली गावाची दुर्गमता पाहता या ठिकाणी गुणवंत शिक्षक सेवेसाठी येतील अशी अपेक्षा धरणे चुकीचे होईल, असे असूनही येथील ग्रामस्थांच्या आणि शिक्षणप्रेमींच्या मदतीने या प्राथमिक शाळेचा शैक्षणिक दर्जा अत्युच्च राखण्यात मुख्याध्यापक सुनील पवार या ध्येयवादी शिक्षकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली दिसून येते.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सडवली गावाकडे या फलकापासून जिथे हा रस्ता संपतो तिथे एका जुन्या बैठया कौलारू इमारतीमध्ये रायगड जिल्हा परिषदेची सडवली उच्च प्राथमिक शाळा नियमित भरते. विद्यार्थ्यांची पुरेशी संख्या शिक्षकांची इच्छाशक्ती पालकांचे सहकार्य आणि ग्रामस्थांचा हातभार या शाळेला लाभल्यानेच शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्यासारखी आहे.

सडवली ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीसमोर अंगणवाडी, शालेय पोषण आहाराचे किचन शेड आणि ही प्राथमिक शाळा जराश्या जुन्याच इमारती असल्यातरी शिक्षणातील नाविन्यपूर्ण प्रयोग या शाळेचे वैशिष्टय बनले आहे. कॉम्प्युटर, प्रोजेक्टर, इंटरनेट सुविधा, आनंदी शिक्षणाच्या वेगवेगळया क्लुप्तया या सोबतच मुख्याध्यापक सुनील पवार आणि त्यांच्यासोबतच्या दोन सहकारी शिक्षिका पुनम शिवाजी पवार आणि यांनी विद्यार्थ्यांच्या बौध्दिक क्षमतेमध्ये लक्षणीय प्रगती घडवून आणली आहे. डिजिटल स्कूल, स्मार्ट स्कूल, स्मार्ट टीचर आणि स्मार्ट स्टुडंटस या सर्व स्मार्टनेसच्या मागे इच्छाशक्तीची जी गरज असते, ती मुख्याध्यापक सुनील पवार यांच्याठायी ठासून भरलेली दिसून येते. यामुळेच त्यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ बोलताना प्राथमिक शाळेची घटलेली पटसंख्या पुर्ववत् ओसंडून वाढावी अशी ध्येयासक्त इच्छा व्यक्त करून सर्वार्थाने शैक्षणिक विकास साधण्यासाठी प्राथमिक शाळाच उपयुक्त असल्याची परिस्थिती शिक्षकांच्या प्रयत्नांतून शक्य असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले.

मुख्याध्यापक सुनील पवार यांनी गूगल प्ले स्टोअर वरून मोफत डाउनलोड करता येण्याजोगी मराठी इंग्रजी प्रश्नसंच,चला वाचू या मराठी, माझी मराठी बालवाडी, मराठी संख्या, फर्स्ट वर्ल्ड ही पाच शैक्षणिक ऍप्स तयार केली असून यापैकी फर्स्ट वर्ल्ड हे ऍप अभ्यासक्रमातील बदलामुळे कालबाह्य झाल्याने त्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून हटविले आहे. मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासोबतच पालकांना तसेच शिक्षकांना देखील या ऍप्सचा उपयोग होतो. इंटरनेटसेवी असलेले मुख्याध्यापक सुनील पवार यांनी 'माझी मराठी शाळा युटयुब चॅनेल'देखील तयार केले आहे. या चॅनलला प्रचंड प्रतिसाद लाभला असून साडेपाच लाखांहून अधिक दर्शकही लाभले आहेत. डिजिटल प्रोजेक्टरवरून या युटयुबद्वारे मोठया पडद्यावर प्रक्षेपण होताच त्यातील कविता, धडे आणि गणिताची उदाहरणे यांचे विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना होत असते.

अवश्य वाचा