मुंबई दि. १५ 

 खडा हनुमान, अमर मंडळ, विजय नवनाथ, श्री राम क्रीडा, भवानीमाता प्रतिष्ठान, न्यू परशुराम यांनी मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत आणि मुंबई शहर कबड्डी असो.ने आयोजित केलेल्या “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी” स्पर्धेच्या कुमार गटाची चौथी फेरी गाठली. नायगाव-वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या कुमार गटाच्या  तिसऱ्या फेरीच्या सामन्यात खडा हनुमानने वारसलेनला ५२-४० असे नमवित आपली आगेकूच सुरू ठेवली. प्रसाद घाग, तन्मय होंगाळे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर खडा हनुमानाने विश्रांतीला २८-११ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात वारसलेनच्या सोहम नार्वेकर, रोहित खरे यांनी आपल्या खेळाची गती वाढवीत सामन्यात रंगात आणली.

   याच गटात अमर क्रीडा मंडळाने शिवप्रेरणा प्रतिष्ठानला ४४-४३ असे चकवीत आपली विजयी घोडदौड सुरु ठेवली. शुभम घाडे, अक्षय कारविलकर यांनी झंजावाती खेळ करीत अमरला विश्रांतीपर्यंत २४-१५ अशी महत्वपूर्ण आघाडी घेऊन दिली होती. उत्तरार्धात मात्र शिवप्रेरणाच्या रोहित चाचे, चिन्मय पाटील यांनी कमबॅक करीत अमर संघाला चांगलेच जेरीस आणले. पण विजयापासून ते वंचितच राहिले. विजय नवनाथने अत्यंत चुरशीच्या ५-५ चढायात विजय क्लबचा विरोध ३३-३१ असा मोडून काढला. हर्ष लाड, प्रथमेश दहीबावकर यांनी विजय नवनाथला मध्यांतराला ११-०९ अशी आघाडी मिळवून दिली होती. पण दुसऱ्या डावात विजय क्लबच्या दिग्विजय भाटकर, आस्वाद केवट यांनी सामन्याच्या अखेरीस संघाला २७-२७ अशी बरोबरी साधून दिली. पण या बरोबरीचे विजयात रूपांतर करणे त्यांना साध्य करता आले नाही.

       श्री राम क्रीडा मंडळाने आदर्श क्रीडा मंडळावर ३६-२७ अशी मात केली. गणेश महाजन, तुषार शिंदे श्री रामकडून, तर शुभम हुमणे, संकेत घाणेकर आदर्श कडून उत्कृष्ट खेळले. भवानीमाता प्रतिष्ठानने दुर्गामाता बालमित्राला २६-१६ असे नमविले. यश कवठकर, सिद्धेश परब भवानीमाताकडून, तर तेजस शिंदे दुर्गामाता बालमित्रकडून उत्तम खेळले. न्यू परशुराम क्रीडा मंडळाने यंग प्रभादेवी क्रीडा मंडळाचा ५०-३३ असा पराभव केला. शुभम धनावडे, ओमकार घोळम यांच्या चतुरस्त्र खेळाच्या बळावर परशुरामने पहिल्या डावात २७, तर दुसऱ्या डावात २३असे गुण वसूल करीत गुणांचे अर्धशतक गाठले.  यंग प्रभादेवीच्या सचिन यादव, गौरव गुरव यांनी दुसऱ्या डावात बऱ्यापैकी प्रतिकार केला.

 

अवश्य वाचा