पाली/बेणसे 

      रायगड जिल्ह्यातील कोंझरी  सामाजिक बहिष्कार (वाळीत) प्रकरणाचा निकाल नुकताच लागला आहे. पाच वर्षाच्या कायदेशीर लढ्यानंतर यातील 24 जणांची अखेर निर्दोष मुक्तता झाली आहे. 

     रायगडमधील ऍड. यशवंत साधू यांनी या प्रकरणात घेतलेला उलट तपास आणि युक्तिवाद संबंधितांना निर्दोष मुक्ततेसाठी महत्त्वाचा ठरला आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील कोंझरी येथील फिर्यादी संदेश रामजी शिगवण व त्यांच्या कुटुंबीयांनी गावातील सुधाकर कापेकर यांच्यासह 24 जणांनी शिगवण व त्यांच्या कुटुंबियांना ऑगस्ट 2014 मधील गोकुळाष्टमी सणानंतर वाळीत टाकले अशी फिर्याद दिली होती. फिर्यादीच्या कुटुंबाशी कोणी बोलले तर त्याला रुपये दोन हजार दंड केला जाईल असा ठराव केला होता. तसेच शिगवण यांच्या घरी गणपती सणाला व सत्यनारायण पुजेला जाण्यास गावकऱ्यांना बंदी घातली तसेच नातेवाईकांना शिवीगाळ, छेडछाड, मारहाण, गुरे चरण्यासाठी नेण्यास बंदी, मित्राच्या हळदीला जाण्यास बंदी, ग्रामदेवतेच्या पूजा अर्चेला बंदी केली असल्याची फिर्याद संदेश शिगवण व कुटुंबीयांनी म्हसळा पोलीस स्थानकात दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यावर फौजदारी न्यायालय श्रीवर्धन 2015 ला हा खटला सुरू झाला. यावेळी सरकारी पक्षाने फिर्यादी सह एकूण दहा साक्षीदार तपासले तर आरोपीकडून एक पंच साक्षीदार रमेश डिंगणकर हे तपासले गेले. जवळपास पाच वर्षे चाललेल्या या खटल्यात आरोपींच्या बाजूने यशवंत साधू यांनी सर्व साक्षीदारांचा उलट तपास घेऊन युक्तिवाद सादर केला. या युक्तिवादामध्ये 31 सप्टेंबर 2014 रोजीच्या घटनेची फिर्याद फिर्यादी यांनी त्या अगोदर नऊ दिवस आधी म्हणजे दिनांक 23 सप्टेंबर 2014 रोजी पोलिस ठाण्यात दिली होती. ही महत्त्वाची गोष्ट यशवंत साधू यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच सप्टेंबर महिन्यात केव्हाही एकतीस तारीख येत नाही त्यामुळे आरोपींवर दाखल करण्यात आलेली फिर्याद व खटला बोगस असल्याचा ऍड. यशवंत साधू यांनी युक्तिवाद मांडला. तसेच खटल्यातील प्रत्येक साक्षीदाराच्या साक्षी मधील विरोधाभास व युक्तिवाद व इतर मुद्दे विचारात घेऊन फौजदारी न्यायालय श्रीवर्धन यांनी सर्व यातील जणांची सर्व गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.

अवश्य वाचा