पनवेल

कुणीही या, काहीही करा अशी पनवेल महापालिका क्षेत्राची अवस्था झाली आहे. त्याचा फायदा कुणीही उठवतो. अशीच चापलुसी करत रौनक अँडर्व्हटाईज कंपनीने शहरातील पुलाखाली दुभाजकांचे सुशोभीकरण करण्याच्या कराराचे उल्लंघन करून चक्क बालाजी सिंफनी नावाच्या बांधकाम कंपनीची लाखो रूपये उकळून जाहिरात सुरू ठेवली. परंतु, त्यातही सुशोभीकरणाला फाटाच दिला. ही बाब लक्षात घेवून पनवेल संघर्ष समितीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार करताच बालाजीच्या दुकानाचे शटर डाऊन करून आता त्याच ठिकाणी रौनकने शेंदूर फासून घेतले आहे.

त्याचे असं झालं, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पनवेल शहरातील वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय म्हणून 189 कोटी रुपये खर्च करून गेल्या नऊ वर्षांपूर्वी अर्धवट अवस्थेत पूल बांधला आहे. त्या पुलाखाली असलेल्या विस्तीर्ण दुभाजकाचे विविधांगी आणि विविधारंगी फुल तसेच शोभेची झाडे लावून त्याचे संगोपन करण्याच्या अटी शर्थीवर रौनक अँडव्हरटाईजला महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने त्यांच्या मागणीनुसार 2016 ते 2025 पर्यंतच्या काळापर्यंत केअर टेकर म्हणून परवानगी दिली आहे.

सुशोभीकरण केल्यानंतर त्या ठिकाणी पूल मालकाच्या कंपनीचे नाव, महापालिकेचे नाव, संगोपन करणाऱ्या ठेकेदाराच्या नावाची तीन चार फूट लांबीची पट्टी सुरक्षा कठड्यावर लावली जाते. इथे रामभरोसे काम असून दुभाजकाच्या कडेला दिसतील अशी तकलादू झाडे लावली असून कोणत्याही प्रकारचे सुशोभीकरण केलेले नाही. दुभाजकावर उंदिर, घुशिंचे साम्राज्य आहे. तिथे उकीरडे तयार झाले आहेत. लावलेल्या रोपट्यांना पाणी शिंपले जात नाही. त्यामुळे शेकडो रोपटीही करपली आहेत.

रौनकने कराराचे उल्लंघन करून नवीन पनवेल परिसरातील अनधिकृत बांधकामाच्या विळख्यात अडकलेल्या बालाजी सिंफनीचे मोठे मोठे होल्डिंग पॉईंट उभे करून शहर विद्रूप केले आहे. यासाठी रौनकने महापालिकेला दोन लाख रुपयांचा जाहिरात महसूल भरला आहे.

पुलाखाली दुभाजकांचे सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली सुरू असलेली रौनकची वाटमारी आणि त्यांच्या खांद्यावर उभे राहून नृत्य करणाऱ्या बालाजी सिंफनीचा मुखवटा फाडण्यासाठी पनवेल संघर्ष समितीने, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने रौनकला दिलेली परवानगीची प्रत मिळवून त्या आधारे थेट व्यवस्थापकिय संचालक राधेश्याम मोपलवार यांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केली. ती कुणकुण लागताच इकडे बालाजीचे फलक हटवून रौनकने स्वतः शेंदूर फासून फलक लावले आहेत. मात्र, यातून सुशोभीकरणाचा मुद्दा बाजूला होत नसल्याने बालाजी आणि रौनक दोन्ही कंपन्या अडचणीत सापडल्या आहेत.

पनवेल संघर्ष समितीने दोन्ही कंपनींवर कारवाई करण्याची मागणी केली असून कायदेशीर कारवाईची अपेक्षा महापालिका आणि एमएसआरडीसी कधी करते याची प्रतीक्षा असल्याचे संघर्षचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी व्यक्त केली आहे.  

अवश्य वाचा