कल्याण दि.११ डिसेंबर २०१९

महावितरणच्या मुरबाड उपविभागात पाच पथकांकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत एकाच दिवशी १६४ ठिकाणी वीजचोऱ्या आढळून आल्या. संबंधित वीजचोरांकडून चोरीच्या विजेचे बिल व दंड वसूल करण्याची कार्यवाही सुरु असून या रकमांचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध पोलिसात फिर्याद देण्यात येणार आहे. 

मुरबाड उपविभागातील धसाई, मुरबाड ग्रामीण व शहर, सरळगाव, शिरोशी आदी शाखा कार्यालयांतर्गत मंगळवारी (१० डिसेंबर) वीज चोरीविरुद्ध विशेष पथकांमार्फत मोहीम राबविण्यात आली. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी वीज तारांवर थेट आकडे टाकून वीजचोरी सुरु असल्याचे आढळून आले. तर मीटर टाळून वीज खांबावरून आलेली वायर (इनकमिंग वायरला टॅपिंग) परस्पर जोडून वीजचोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत. वीज कायदा-२००३ च्या कलम १३५ अन्वये १६१ जणांविरुद्ध तर कलम १२६ नुसार ३ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. वीजचोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जमा करण्यात आले आहे. या पथकांनी कारवाई सोबतच वीजचोरीपासून परावृत्त करण्यासाठी जनजागृतीही केली. कल्याण परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता श्री. दिनेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व कल्याण मंडल-२ चे अधीक्षक अभियंता श्री. धनराज पेठकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. कार्यकारी अभियंता श्री. पांडुरंग पाटील, उपकार्यकारी अभियंता श्री. एस. डी. सुराडकर, सहायक अभियंता श्री. एस. व्ही. सोनवणे, एच. कऱाल्लू, राजेंद्र शिर्के, कपिल गाठले, दीपक कराड, कनिष्ठ अभियंता पी. टी. नहिरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.