दिघी

बोर्लीपंचतन स्मशानभूमीत कचरा टाकून सद्या स्मशानभूमीला ‘डंपिंग ग्राउंड’चे स्वरूप आले होते. यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने येथील ग्रामस्थांनी सातत्याने कचरा हटवण्याची मागणी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत ग्रामपंचायतकडून स्मशानभूमीतील स्वच्छता करण्यात आली.

बोर्लीपंचतन हे श्रीवर्धन तालुक्यातील महत्वाचे गाव आहे. गावाला जोडून असणारे दिवेआगर पर्यटन स्थळ व प्रसिद्ध बाजारपेठमुळे बोर्ली गाव चर्चेत आहे. असे असताना येथील स्मशानभूमीत दिसणाऱ्या अस्वच्छतेमुळे अंत्यसंस्काराला येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असे. गावाचा विस्तार मोठा आहे. मात्र, कित्येक वर्षे ग्रामपंचायतीतर्फे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यायी जागा नसल्याने स्मशानभूमीचा वापर करण्यात येत आहे. यामुळे सद्या मोक्ष मिळण्याच्या स्मशानभूमी परिसरात कचरा असल्याने अक्षरशः कचरा डेपोचे हिडीस स्वरूप आणले होते.

येथील शेतकर्यांना आपल्या शेतीकडे जाण्यासाठी स्मशानभूमी जोडून रस्ता आहे. याच रस्त्याचा वापर स्थानिक नागरिक करतात. मात्र, रस्त्याला असणाऱ्या स्मशानभूमीत कचरा असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. अंत्यसंस्काराला येणाऱ्या व शेतीकडे जाणाऱ्या नागरिकांना नाक मुटीत घेवून याच रस्त्यानी  ये - जा करावी लागत असल्याने बोर्लीपंचतन येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती होती. हा कचरा लवकरात लवकर उचलावा अशी मागणी स्थानिकांनी ग्रामपंचायतकडे करताच येथील कचरा वेळेस उचलण्यात आला.

यावेळी स्मशानभूमीतील कचऱ्याची विल्हेवाट करण्यात आली आहे. याकरिता जनता शिक्षण संस्थेचे विश्वस्त तसेच कार्यकारणी यांचे सहकार्य लाभले. पुढच्या काळात स्वच्छ गाव, सुंदर गाव होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्नशील राहावे व डंपिंगसाठी नवीन जागेचा शोध सुरु असून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. असे ग्रामपंचायतकडून सांगण्यात आले.

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी