पाली/बेणसे 

मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी रायगड जिल्ह्यासह राज्य व देशभरातील मराठा समाजबांधवांनी  एकजुटीने व्यापक स्वरूपाचे आंदोलन केले. शांतता व सांविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजबांधवांवर सरकारने खोटे गुन्हे दाखल केले आहेत.आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी ताराराणी ब्रिगेड प्रदेश अध्यक्षा वंदनाताई मोरे यांनी केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी,काँग्रेस, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत विराजमान झाल्यानंतर कोकणातील नानार प्रकल्प, आरे आंदोलन, तसेच भीमा कोरेगाव आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार घेत आहे. अशातच मराठा आंदोलकांवरील गुन्हे देखील सरकारने मागे घ्यावेत व एकही तरुण शिक्षण व नोकरीपासून वंचित राहणार नाही,कुणाचेही भवितव्य अंधारमय होणार नाही यासाठी सरकारने जलद व सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी जोरदार मागणी वंदनाताई  मोरे यांनी केली आहे. पालीत रविवारी ताराराणी ब्रिगेड पदाधिकारी व कार्यकर्त्याची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी  पुढील आंदोलनाबाबतची दिशा  ठरविण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.  मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसह मराठा समाजबांधवांनी राज्य व देशभरात लाखोंच्या संख्येने मोर्चे काढून राज्य शासनाकडे आपल्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला. एकाच वेळी एकाच दिवशी विविध गाव खेडे पाडे, तालुके, जिल्हे व राज्यभरात धरणे, जेलभरो, रास्ता रोको, आदी आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या. मराठा आरक्षणासंदर्भात व धनगर आरक्षणासंदर्भात भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळात सरकारविरोधी रोष दाखवत धनगर समाजातील युवकांनी व मराठा समाजातील युवकांनी जोरदारपणे लोकशाही मार्गाने आंदोलने केली या आंदोलकांचा सरकारी यंत्रनेची नासधूस करण्याचा कोणताही हेतू नव्हता परंतु सरकार विरोधी रोष दाखवताना काही गुन्हे दाखल झालेले आहेत हेही गुन्हे या सरकारने मागे घ्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. मराठा आरक्षण लढ्यात कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी यापूर्वी मागील सरकारकडे पाठपुरावा केला. पण त्यांनी अटी घातल्या.. या प्रकरणांमध्ये जे पडकले गेले आहेत, त्यांचा दोष नसल्याचे पुरावे देखील सरकारला दिले आहेत. मात्र, अजूनही गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत.’’

मराठा आरक्षण मोर्च्यात बाह्य शक्ती घुसल्या होत्या. पण पोलिसांनी निर्दोष आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत.  गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मागे सरकारने केवळ आश्‍वासने दिली आहेत. नव्या सरकारने विनाअट सर्वांवरील गुन्हे मागे घ्यावेत. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत.’’असेही वंदनाताई मोरे यांनी सांगितले. मराठा समाजाच्या आंदोलनाची फलश्रुती होत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले. मात्र अन्य महत्वाच्या मागण्या आजही प्रलंबित आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आपले सरकार असल्याची भावना व धारणा जनमानसात झाली आहे.  सरकारने मराठा समाजाला योग्य तो न्याय द्यावा,  अशी मागणी मराठा आरक्षण समन्वय समितीचे  अध्यक्ष विजयसिंग राजे महाडिक व वंदनाताई मोरे यांनी केली आहे. यावेळी ताराराणी ब्रिगेडचे सुधागड सह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते. 

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी