अलिबाग, दि.09 

कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशानुसार दि.07 नोव्हेंबर ते 07 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती अभियानचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे यांचे हस्ते दि.07 नोव्हेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले होते.

या अभियानामध्ये मुख्य:त्वे व्यापारी असोसिएशन, हॉटेल असेासिएशन, मॅन्युफक्चरिंग असोसिएशन, संस्था चालक/मालक, विटभट्टी चालक/मालक, गॅरेजेस, ढाबे यांना  कायद्यातील तरतुदींची माहिती देऊन जनजागृती करणे तसेच सेल्फी पाँईट प्रदर्शित करणे, टोल नाक्यावर हायवेवरती बाल कामगार प्रथेविरुध्द होर्डींग्ज प्रदर्शित करणे आणि वेगवेगळ्या स्तरावर चर्चासत्र आयोजित करणे, रॅली,पथनाट्य,स्वाक्षरी मोहिम राबविणे,विटभट्टी मालक/चालक यांच्याकडून हमीपत्र लिहून घेणे, आकाशवाणीच्या माध्यमातून जनजागृती करणे,स्थानिक केबल वरुन प्रथेविरुध्द संदेश देणे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात संपूर्ण महिनाभरात केलेल्या जनजागृती कार्यक्रमाची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त संभाजी व्हनाळकर यांनी सर्व उपस्थितांना दिली.  तद्नंतर कामगार उप आयुक्त प्र.ना.पवार यांनी या अभियानात सर्वांनी सहभाग नोंदवून ही अनिष्ठ प्रथा नष्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे असे आवाहन केले.या बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती कार्यक्रमाचा (शनिवार दि.07 डिसेंबर रोजी ) सांगता समारंभ घेण्यात आला. यावेळी व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी, हॉटेल असेासिएशन, बांधकाम व्यावसायिक प्रतिनिधी,अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अवश्य वाचा