आठवण जी विसरता येत नाही ती. आयुष्य ही आठवणींची एक मालीकाच असते. व्यकती्गणीक स्मरण  शक्तीचा विकास  जसा होतो तसा आठवणींचा संग्रह मेंदूच्या एखाद्या कप्प्यात होत असेल. मनात आठवणी साठत रहातात असं आपण समजतो.

आता मन ही आपल्या शरीरातील एक संस्था नक्की कुठे काम करते हे शरीर विज्ञानाचा अभ्यास करणारे सांगू शकतील. ती मेंदूत काम करते की ह्रदयात ?  पण आठवणी या ह्रदयाशी संबंधीत असतात, मग त्या सुखावणार्या असोत की दुखावणार्या ,असोत आणि मनाशी निगडीत असतात हे मात्र खरे.  एखाद्या व्यक्तीच्या आठवणी बालपणापासूनचया असतील, कदाचित ते बालपण हा त्या व्यकतीचा सुखाचा काळ असेल. सर्वसाधारणपणे बालपणीचा काळ सुखाचा असे आपण म्हणतो पण सर्वांच्याच बाबतीत तसे नसते, तो काळ सुखाचा नसेल तर मग तो का लक्षात रहावा ? कटू आठवणीही लक्षात रहातातच पण आपण कालांतराने समजून उमजून त्या ऊगाळत बसत नाही. परिणामी त्या  विस्मरणात जातात. आणि  ते योग्यच असते. बालपणी कोणी केलेले लाड जितके लक्षात रहातील तितकाच कोणी केलेला छळही लक्षात राहील कोणी केलेल्या लाडाचया कौतुकाच्या आठवणी मनाला आयुष्यभर आनंद देत रहातील त्या उलट कटू आठवणी त्रास देत रहातील म्हणून त्रास देणार्या आठवणी उगाच काढून त्रास कशाला करून घ्यायचा ही मनाची प्रवृत्ती असते. पुढे शालेय जीवनाचा काळ येतो. या आठवणी मात्र बहुतांश सुखाच्या असतात. शाळेतील मित्र मैत्रिणींचा मैत्र विसरता येत नाही. कितीतरी असंख्य आठवणी या काळात मनात कायमच्या घर करून रहातात मग त्यात लटक्या भांडणाचे प्रसंगही आले. प्रत्येकजण वेगवेगळ्या कौटूंबिक आर्थिक परिस्थितीतून आलेला असतो पण शाळेत ,वर्गातील बाकावर बसताना हा भेदभाव नसतो.तेथे मनाची निरागसता असते. मधल्या सुट्टीत एकमेकांचे डबे चवीनेफस्त होतात. "ए तुझ्या  आईने केलेला गोड शिरा ऊद्या डब्यात आण , मला तो गोड शिरा खूप आवडतो. माझ्या आईनं केलेलं थालिपीठ तूला आवडतं ना ? मी आईला सांगेन. " या आठवणी त्या पदार्थांच्या  चवीसह लक्षात रहातात. चित्रकलेचया देशपांडे सरांनी शिकवलेले फ्री हॅड ड्रॉईंग, गोखले सरांचे तर्खडकरी ईंग्रजी, पी.टी.च्या सरांनी घेतलेली मुला मुलींची खो खो स्पर्धा आणि मुलींसमोर माॅनिटर म्हणून उगाचच खाल्लेला भाव, चतुर्शृंगीची सहल,आणि मुलींना चिंचा काढून देण्यासाठी भाव खात झाडावर चढलेला आणि पडलेला पकया खांडेकर, या सगळ्या सगळ्या  आठवणी कालच घडून गेलयासारखया वाटतात. नंतरचा काळ कॉलेजच्या रोमांचित करणार्या आठवणींचा. प्राधयापकांची घेतलेली फिरकी, पिरियेडला दांडी मारून तिच्या सोबत पाहिलेले मॅटीनी शो,एस पी च्या ग्राऊंडवरील क्रिकेट मॅचेसची धमाल, हाॅसटेल रेकटरशी भाव खाण्यासाठी उगाचच घातलेले वाद, आणि हळूवारपणे जुळलेलया प्रेमकथा,मासिक हसतलिखितातील तिला आवडलेल्या माझ्या  लेखनामुळे आनंदित झालेली ती, आणि तू किती छान लिहितेस रे ! हे मृदू स्वरातली तिने केलेले कौतुक, जणू मोरपिसाचा स्पर्श.या आठवणी आजही सुखाऊन जाणार्याच. त्यानंतर संसाराचा मांडलेला डाव, सुरवातीचे सुखाचे क्षण,रूक्ष नौकरी, बाॅसशी वाद,अन्याय,बदल्या,आर्थिक चणचण, मुलांचे बालपणीचे हट्ट पुरवता पुरवता झालेली दमछाक,त्याचे शिक्षण, यशापयश, त्यांना पायावर ऊभे करण्याची धडपड, त्यांचे ऊभे करून दिलेले संसार, सगळ्या सगळ्या सुखावणार्या, दुखावणार्या  आठवणींचे एकावर एक चढलेले स्तर जणू. विसरता येत नाहीत आणि लक्षात ठेवणयावाचून गत्यंतर  नाही.

मधून मधून उजळणी करायची ती सुखाच्या क्षणांची . मनाला थोडीशी का होईना उभारी येण्या साठी.  पुढील आयुष्यात वाढून ठेवलेल्या क्षणांचा ना खेद ना खंत.! आठवणींचा पूर्णविराम कधी होतोय त्याची वाट पहायची त्रयस्थ पणे.सुखाच्या क्षणांची बेरीज नसते फक्त वजाबाकीच  !

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी