पाली-बेणसे

श्रमजिवी संघटनेच्या वतीने जागतीक मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून आदिवासी कातकरी समाज बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी सोमवार दि.(9) रोजी पाली पंचायत समिती ते तहसिल कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला. श्रमजिवी संघटनेचे संस्थापक विवेकभाउ पंडित, संस्थापिका विध्दुलताताई पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष रामभाउ वारणा यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात लहान मुले, वृध्द, महिला- पुरुष तरुण तरुणींचा लक्षणिय सहभाग होता. यावेळी संघटनेच्या वतीने पाली सुधागड तहसिलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सदर मोर्चाद्वारे पाली तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात भारतीय राज्यघटनेच्या भाग 4, अनुच्छेद -46 मधिल मार्गदर्शक तत्वानुसार आदिवासींचे सामाजिक, आर्थिक, राजकिय, शैक्षणिक हितसंवर्धन करण्याची जबाबादारी राज्य सरकारची आहे. आदिवासींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातून होत असून स्वातंत्र्याच्या 72 वर्षाचा काळ उलटला तरी आजही आदिवासी समाजबांधवांना मुलभूत प्रश्न, नागरी सेवासुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. विविध प्रश्न व समस्यांचा सामना करीत अत्यंत कष्टप्रद व दारिद्र्याचे जिवन जगावे लागत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. स्थलांतरात माणसाची बोली लावून जिवनाची होळी केली जाते असा संताप संघटनेच्या पदाधिकार्यांनी यावेळी व्यक्त केला. पोलीस प्रशासनाकडून देखील आदिवासी बांधवांची मुस्कुटदाबी होत असल्याचा आरोप देखिल आंदोलनकर्त्यांनी केला. या मागण्यांमध्ये रेशनिंग समस्याबाबत आवाज उठविण्यात आला. सुधागड तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदार  अंत्योदय योजनेचे रेशनकार्डमधील कुटुंबाच्या मुलांना देखील धान्य देत नाहीत. अंद्योदयमधील सर्व कुटुंब स्थलांतरीत झाल्याने त्यांच्या वाट्याचे धान्य रेशनदुकानदारांना देवू नये. सर्व वाड्यांमधील स्थलांतरीत कुटुंबाचा सर्वे करण्यात यावा. स्थलांतरीत कुटुंब परत आल्यावर अंत्योदय योजनेतील 1 व 2 व्यक्तिंना माणसी 5 किलो धान्य न देता त्यांना 35 किलो धान्य द्यावे. त्यांना प्राधान्यामध्ये वर्ग करु नये. सुधागड तालुक्यातील सर्व आदिवासींना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा. कुपोषण रोखण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. तसेच राज्यपाल महोदयांच्या आदेशाप्रमाणे कातकरी कुटुंबाची घराखालील जमीन तर ठाकूर, आदिवासी, मागासवर्गीय यांच्या घराखालील जमीन नावे करण्यात येवून प्रत्येक कुटुंबाल किमान 1 गुंठा क्षेत्र मंजूर करण्यात यावे. सुधागड तालुक्यातील प्रत्येक आदिवासी वाडीसाठी 3-1  चे किती सामुदायीक दावे मंजूर केलेले आहेत. त्याच्या किती सनदी वाटप केलेल्या आहेत. 3-2 चे किती दावे मंजूर आहेत, वैयक्तीक प्रलंबित दाव्यांची सुनावणी घेवून ते फेर सादर करण्यात यावे. वैयक्तीक दाव्यांच्या फेरमोजणी करुन सातबारा नावे लावणे, तर सामुदायीक दाव्यांच्या सनदी वाटप झालेल्या असतील तर त्याची मोजणी करुन क्षेत्र निच्छीत करणे, आदिवासीं बांधवांना रस्ते, पाणी, विज, आरोग्य,रोजगार, घरकुल योजना, समाजमंदिर,शौचालय, घरपट्टी आदी नागरी सुविधा देणे, अंगणवाडीतील मुलांना व स्तनदा मातांना वाटप केलेले धान्य पुर्ण वाटप झालेले नाही त्याची चौकशी करणे, सुधागड तालुक्यातील आदिवासींवर पोलीसांकडून मिळणारी अपमानकारक वागणूक व वाढता अन्याय थांबविणे, आदिवासी बांधवांच्या अशिक्षितपणाचा फायदा उठवून आगावू बयाना देवून कामासाठी बाहेर स्थलांतर करुन होत असलेले त्यांचे शोषण व पिळवणुक थांबविणे. स्थलांतरादरम्यान गाडीतून पडून मयत झालेल्या बबन हाडक्या पवार यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करावी, आदिवासी बांधवांना वेठबिगारी करण्यास भाग पाडणार्यांना वेठबिगारी कायदा व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी. शासनाने स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे त्वरीत सुरु करावीत. रोजगार हमी योजनेची माहिती देण्यासाठी ग्रामपंचायतीवार मेळावे भरवावेत, आदी मागण्यांचे निवेदन पाली तहसिलदार यांना देण्यात आले.

आदिवासी कातकरी ढोर न्हाय माणुस हाय, माणुसकीची भिक नको, माणुसकीची भिक नको हक्क हवा हक्क हवा, कोण बोलतोय देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय, लाठी गोली खाएंगे फिर भी आगे जाएंगे,योजना आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, श्रमजिवी संघटना जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, अधिकारी बोलतात देणार नाय अरे घेतल्याशिवाय राहणार नाय, अशा गगनभेदी घोषनांनी आदिवासी कातकरी समाजबांधवांनी संपुर्ण पाली दणाणून सोडली. यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष रामभाउ वारणा, राज्य सरचिटणिस बाळाराम भोईर, जिल्हा सरचिटणिस संजय गुरव, तालुकाध्यक्ष शशिबाई वाघमारे, तालुका उपाध्यक्ष तुकाराम पवार, माजी अध्यक्ष मारुती वाघमारे, तालुकाध्यक्ष हिराताई पवार, तालुका सचिव योगीता दुर्गे, तालुका उपाध्यक्ष हिरामण नाईक, शंकर वाघमारे, किसन वाघमारे, गणेश वाघमारे, राधिका पवार, सुरेश जाधव, किसन वालेकर, काळुराम मोरे, गणपत हिलम आदिंसह मोठ्या संख्येने आदिवासी कातकरी बांधव उपस्तीत होते. सदर निवेदनाची तत्काळ दखल घेवून योग्य न्याय न दिल्यास आदिवासी, कातकरी, ठाकूर समाजबांधव राज्यव्यापी आंदोलन छेडतील असा संतप्त इशारा आंदोनकर्त्यांनी दिला.  दरम्यान आदिवासी बांधवांनी दिलेल्या निवेदनाचा गांभिर्यपुर्वक विचार करुन योग्य व जलद कार्यवाही केली जाईल असे पाली सुधागड तहसिलदार दिलीप रायन्नावार यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासीत केले. यावेळी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये या दृष्टीने पाली पोलीस निरिक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी