चिपळूण

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडणारा कराड चिपळूण रेल्वे मार्ग हा सर्वात किफायतशीर आणि आवश्यक असा असून यामुळे हजारोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या नागरिकांची वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे तसेच प महाराष्ट्रातून येणाऱ्या साधनसमुग्रीच्या वाहतुकीला देखील सुलभता येणार आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱया व आर्थिक तरतुदीनंतरही रखडलेल्या चिपळूण-कराड रेल्वेमार्ग प्रकल्पाला चालना देण्याच्या दृष्टीने आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनातही लक्षवेधीद्वारे सरकारचे लक्ष वेधणार असल्याची माहिती आमदार शेखर निकम यांनी दिली.  

गेल्या अनेक वर्षापासून कोकण रेल्वे मार्गावरील नवीन प्रकल्पासह दुपदरीकरण आणि बंदरे जोड प्रकल्प रखडले आहेत. त्यामध्ये चिपळूण-कराड रेल्वेमार्गाचा समावेश आहे. या रेल्वेमार्गासाठी माजी मुख्यमंत्री आणि कराडचे सुपूत्र पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. मुख्यमंत्रीपदी असताना राज्याच्या तिजोरीतून आर्थिक तरतूदही केली होती. पुढे कोकणचे सुपूत्र आणि तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी विशेष प्रयत्न करत केंद्रीय अर्थसंकल्पात या मार्गासाठी निधीची तरतूद केली. मात्र प्रभू यांचे मंत्रीपद गेल्यानंतर हा प्रकल्प मागे पडला. दरम्यान, मध्यंतरी शापूरजी पोलोनजी कार्पोरेशनबरोबर करार रद्द झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा सरकारवर टीका करताना बुलेट ट्रेनसाठी चिपळूण-कराड मार्गाचा बळी दिला गेला असल्याचा आरोप केला होता.  

दरम्यान, या रखडलेल्या प्रकल्पाला चालना मिळण्याच्यादृष्टीने आमदार निकम यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यादृष्टीने नागपुरातील हिवाळी अधिवेशनात या रेल्वेमार्गाबाबत लक्षवेधी उपस्थित करत लक्ष वेधले आहे. यासंदर्भात बोलताना  आमदार शेखर निकम यांनी सांगितले की, चिपळूण-कराड या ११२ कि. मी.च्या नव्या रेल्वेमार्गासाठी मंजूर झालेल्या १२०० कोटीपैकी निम्म्या रक्कमेची आर्थिक तरतूद राज्यसरकारने प्रस्तावित केली आहे. या रेल्वेमार्गात कराड, चिपळूण, वेहळे, मुंढे, कोयना रोड, पाटण, शेडगेवाडी, खोडशी ही स्थानके प्रस्तावित असून ४६ किलोमीटरचे बोगदे आहेत. यामध्ये कुंभार्ली घाटात ७ कि. मी. लांबीचा बोगदा सर्वात मोठा असणार आहे. आर्थिक तरतूद झालेली असतानाही प्रकल्पाला चालना का नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.

कराड-चिपळूण रेल्वेमार्ग होणे काळाची गरज असून आज पश्चिम महाराष्ट्रातील असंख्य नागरिक नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने कोकणात स्थिरस्थावर झाले आहेत.त्यांना हा प्रवासासाठी अतिशय सोपा आणि फायदेशीर मार्ग ठरणार असल्याने या प्रवासाला प्रचंड प्रतिसाद मिळणार असल्याने रेल्वेला आर्थिक फायदाच होणार आहे.तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लोकोपयोगी योजनांचा,प्रकल्पांचा लाभ तसेच शैक्षणिक आणि वैद्यकीय सुलभता देखील क्रमप्राप्त होणार आहे.या मार्गासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने आपण सर्व स्तरातून प्रयत्न करून हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेखर निकम यांनी सांगितले.

अवश्य वाचा

पैशांसाठी देशद्रोह

टीकेकडे लक्ष द्या...