बोर्ली मांडला

       गेली दहा वर्ष कोकण कडा मित्र मंडळाने मुरुड नगरपरीषदेच्या सहकार्याने सुरु केलेला पद्मदूर्ग जागर या स्वच्छता व संवर्धनाच्या उपक्रमामुळे दरवर्षी पद्मदूर्ग पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असल्याचे दिसते. गेली कित्येक दशके तथाकथित बंदीच्या भितीमुळे या किल्ल्याकडे कोणीही फिरकत नव्हते. पण पद्मदूर्ग जागरमुळे शिवप्रेमी व पर्यटकांमध्ये कमालीची जागरूकता आली आहे हे नक्की. याची दखल घेत पुरातत्व खात्याने देखील पद्मदूर्ग मध्ये एकदा उत्खननाचा उपक्रम घेतला होता. पण याच्या कायमस्वरूपी संवर्धनासाठी येथे भव्य शिवस्मारकाची उभारणी करणे गरजेचे ठरणार आहे.

        भारतीय आरमाराचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज यांनी जंजिऱ्याच्या सिद्धी घराण्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मुरुड शहराच्या पश्चिमेला सुमुद्रात एका बेटावर बांधण्यात आलेल्या पदमदुर्ग किल्ला पर्यटन दृष्ट्या विकिसित करण्याची ही काळाची गरज आहे.

        2008 साली कोकण कडा मित्र मंडळाच्या मार्गदर्शनाखाली पद्मदूर्ग जागर हा अभिनव उपक्रम मुरूड समोरील पद्मदूर्ग या जलदुर्गावर सुरू झाला. गेली दहा वर्षे सातत्याने कोकण कडा मित्र मंडळ या जलदूर्गावर हजारो मावळे घेऊन स्वच्छता व जागर कार्यक्रमांतून जनजागृती करीत आहे. हा सोहळा इतक्या दिमाखाने दरवर्षी होत असल्याने दरवर्षी या कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप येत आहे. या उपक्रमामुळे  वर्षभरात असंख्य पर्यटक, शिवप्रेमी  पद्मदुर्ग पाहण्यास महाराष्ट्रातून येत आहेत. परंतु या पद्मदुर्गाची दिवसेंदिवस होणाऱ्य़ा वाताहातीकडे मात्र केंद्र शासनाचे पुरातत्व खाते भविष्यात किती लक्ष देईल याकडे शिवप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर या जलदुर्गाच्या कायमस्वरुपी संवर्धनासाठी या जलदूर्गावर भव्य शिवस्मारक झाले तर हा किल्ला देशाकरीता पर्यटनीय ठरेल यात शंका नाही.

        2008 सालापूर्वी या पद्मदूर्ग जलदूर्गाकडे शिवप्रेमी फिरकत देखील नव्हते. तथाकथीत बंदीच्या कल्पनेने या किल्ल्याकडे केवळ किनाऱ्यावरूनच पाहता येत होते. कोळी व्यावसायिक या किल्ल्यावर नेण्यास बंदी असल्याचे सांगायचे. पण कोकण कडा मित्र मंडळाचे मार्गदर्शक पत्रकार दीपक शिंदे, अध्यक्ष सुरेश पवार, मुरूड येथील फोटोग्राफर सुधीर नाझरे, पत्रकार किरण बाथम, प्रकाश सरपाटील यांनी एक दिवस या किल्ल्यावर फेरफटका केला आणि या किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी दरवर्षी जागर करण्याचे ठरवले. नेहमीप्रमाणे पुरातत्व खात्याने या उपक्रमास प्रारंभी विरोधही केला. परंतु स्वच्छतेच्या कामातून पुरातत्व खात्याने कोकण कडा मित्र मंडळाला सशर्त मौखिक परवानगी दिली. परंतु या किल्ल्याकडे जायचे म्हणजे बोट हेच एक माध्यम होते. त्यामुळे बाळा साखरकर सारखे मुरब्बी व अनुभवी तांडेल या कामी दरवर्षी उपयोगी पडतात. त्यांचं संपूर्ण कुटुंब या कामी आपल्या बोटी घेऊन या उपक्रमात सक्रीय सहभाग घेतात. यासाठी मुरूड नगरपरिषदेचे तत्कालीन अध्यक्ष मंगेश दांडेकर, सौ. कल्पना पाटील व सध्याचे नगराध्यक्षा सौ. स्नेहा पाटील यांनी आजपर्यंत आर्थिक सहकार्य केले आहे. 

         दरवर्षी महाड, श्रीवर्धन, म्हसळा, माणगांव, रोहा, अलिबाग, पेण, भिवंडी, ठाणे, मुंबई येथून हजारो शिवप्रेमी या पद्मदूर्ग जागरसाठी उपस्थित असतात. यासाठी आदल्या दिवशी शिवपालखी सोहळा असतो. या सोहळ्यात किल्ले रायगडावरून छ्त्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेली पालखी गावागावातून स्वागत होत येत असते. तीन वर्षापूर्वी हीच पालखी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून निघावी अशी मागणी झाली आणि गेल्यावर्षी श्रीवर्धन तालुक्यातून हा शिवपालखी सोहळा सुरू झाला. आदल्यादिवशी सायंकाळी ही पालखी मुरूड येथे येते आणि मुरूड शहरात या पालखीचे भव्य स्वागत ग्रामस्थांकडून व विविध संस्थांकडून होते. दुसऱ्या दिवसाच्या जागर साठी शेकडो शिवप्रेमी मुरूडमध्ये दाखल झालेले असतात. या सर्वांची राहण्याची व्यवस्था मुरूड नगरपरिषदेतर्फे नगरपरिषदेच्या सभागृहात व कोळीवाड्यातील सभागृहात केली जाते. या व्यवस्थेबरोबर सर्वांच्या भोजनाची व्यवस्था मुरूड नगरपरिषदेमार्फत केली जाते. गेली दहावर्षे ही व्यवस्था मुरूड नगरपरिषदेमार्फत केली जात असल्याने या उपक्रमात मुरूड नगरपरिषदेचा महत्वाचा वाटा आहे. परंतु कोकण कडा मित्र मंडळाचे कार्यकर्ते वेळप्रसंगी किल्ल्यावर एक दिवस राहून स्वच्छता करण्याचे मोठे काम करत आले आहेत. गेल्यावर्षी पद्मदूर्ग जागर पूर्वीची शिवपालखी मिरवणूक श्रीवर्धनहून शेखाडी मार्गे दिवेआगर, बोर्लीपंचतन, शिस्ते मार्गे दिघी व फेरीबोटीतून आगरदांडा मार्गे तेलवडे मार्ग मुरूड येथे आली होती. दरवर्षी तेलवडे ग्रामस्थ या पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहाने गावात पालखी फिरवत करीत असतात.

       ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पद्मदुर्ग किल्ल्याची सध्या दुरवस्था झाली आहे. पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या किल्ल्याचे अवशेष ढासळण्यास सुरुवात झाली आहे. या किल्ल्यांचे वेळीच संवर्धन केल नाही तर मराठा साम्राज्याच्या शौर्याची गाथा सांगणारा हा अनमोल ठेवा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.सागरी सीमांवर जो राज्य गाजवेल, तो लगतच्या भूभागावरही अधिराज्य गाजवेल, हे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणले होते. यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी कोकण किनारपट्टीवर देशातील पहिल्या मराठा आरमाराची उभारणी केली होती. सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी कोकण किनारपट्टीवर जलदुर्गाची उभारणी केली होती. मुरुडचा पद्मदुर्ग किल्लाही यापैकी एक. जंजिऱ्याच्या सिद्धी घराण्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मुरुड शहराच्या पश्चिमेला सुमुद्रात एका बेटावर या किल्ल्याची उभारणी करण्यात आली. कासवाच्या आकाराच्या बेटावर बांधकाम झाल्याने या किल्ल्याला कासा किल्लाही संबोधले जात असे. तर किल्ल्याची तटबंदीचे बुरूज कमळाच्या आकारासारखे असल्याने किल्ल्याचे नाव पद्मदुर्ग पडले. छत्रपती संभाजी राजांनी या पद्मदुर्गावरून मुरुडच्या जंजिरा किल्ल्यावर दोन वेळा चढाई केली होती. 

  आज मात्र या ऐतिहासिक किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. किल्ल्याची तटबंदी ढासळण्यास सुरुवात झाली आहे. सागरी लाटांच्या तडाख्याने तटबंदीच्या दगडांची झीज होण्यास सुरुवात झाली आहे. किल्ल्यावरील तोफा गंजून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. स्थानिक दळणवळणाची साधने सहज उपलब्ध होत नसल्याने पर्यटकांनी किल्ल्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा वारसा असणाऱ्या या ठेव्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

साधारण सन 1675 च्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी कासवाच्या आकाराचा खडक म्हणजे कासा बेटावर हा किल्ला दर्यासारंग मायनाक भंडारी व दौलतखान यांच्यावर जबाबदारी देत हा पद्मदूर्ग किल्ला बांधून घेतला होता. त्यावेळी जंजि-याच्या सिद्दीच्या उरावर दुसरी राजपूरी शिवाजीने बांधली असे उल्लेख अनेक ऐतिहासिक दाखल्यांतून दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांना जंजिरा घैतला आला नसला तरी जंजि-याला येणारी परकीय व ब्रिटीश रसद तोडून स्वराज्याच्या संपत्तीत वाढ होत होती. म्हणूनच आता महाराष्ट्र सरकारने याच पद्मदूर्गावर भव्य शिवस्मारक उभं करावं आणि दिवसेंदिवस जीर्ण होत जाणा-या पद्मदूर्गाच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा करावा उशी मागणी जिल्ह्यातील शिवप्रेमींकडून होत आहे. यामुळे पद्मदूर्गाकडे पर्यटकांचा ओघ वाढेल व येथील व्यावसासायिकांना नव्या उद्योगातून रोजगार उपलब्ध होईल यात काही शंका नाही.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.