रोहा दि.०६

रोटरी क्लब ऑफ रोहा आयोजित कोकण हिल चॅलेंजर हाफ मॅरेथॉन स्पर्धेत या वर्षी केनिया आणि इथिओपिया या आफ्रिका खंडातील देशातून धावपटू येणार असून नुकतीच या देशातील धावपटूंनी आपली नोंदणी केली आहे. रोहा येथे आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धावपटू सहभाग घेणार असल्याने कोकण हिल चॅलेंजर हाफ मॅरेथॉन स्पर्धेची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ रोहा चे अध्यक्ष विक्रम जैन यांनी दिली. 

कोकण हिल चॅलेंजर हाफ मॅरेथॉन या रोहा येथे आयोजित होणाऱ्या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून १५ डिसेंबर रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील धावपटू या स्पर्धेत सहभागी होणार असल्यामुळे रोहेकर तसेच रायगड जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे. देशभरात आयोजित होणाऱ्या निरनिराळ्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होणारे नावाजलेले धावपटू रोह्यात होणाऱ्या कोकण हिल चॅलेंजर हाफ मॅरेथॉन स्पर्धेत धावणार आहेत.

रोहे परिसरातील टेकड्या आणि त्या वरील दाट वनराई यातून जाणार मार्ग हे या कोकण हिल चॅलेंजर हाफ मॅरेथॉनचे वैशिष्ट्य आहे. आपल्या नावातच कोकण असलेल्या या स्पर्धेचा संपूर्ण मार्ग कोकणच्या सौंदर्याने परिपूर्ण असा आहे. मागील वर्षी सहभागी झालेले अनेक धावपटू या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी या वर्षी पुन्हा भाग घेत असून या धावपटूंच्या माध्यमातून अनेक नवीन धावपटू या वर्षी सहभागी होत आहेत. त्यातच परदेशी धावपटू सहभाग घेत असल्याने स्पर्धेचा स्तर उंचावत असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ रोहा चे सचिव सुरेंद्र निंबाळकर यांनी दिली.

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी