अलिबाग 

अलिबाग शहरातील मासळी बाजारपेठ,  व परिसरात स्वच्छता राखणे, मासळी विक्रेत्यांसह  नागरिक व महिलांची सुरक्षा ठेवणे याकडे लक्ष केंद्रीत करून बाजार पेठेमध्ये विविध सुविधा पुरविण्यात येणार आहे.  मासळी बाजार कात टाकणार असून नुतनीकरणाचे काम लवकरच करण्यात येणार असल्याचे अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले. 

अलिबाग शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी 21 गुंठे क्षेत्रामध्ये मासळी बाजारपेठ आहे. यातील 8 गुंठे क्षेत्रामध्ये  मासळी विक्रीची अद्ययावत इमारत 2005 - 2006 साली बांधण्यात आली होती. इमारतीच्या परिसरात मासळी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती.  मासळी विक्रेत्यांना बसण्यासाठी तसेच त्यांच्याकडील मासळी सुरक्षीत ठेवण्यासाठी या बाजारपेठेत सुविधा करण्यात आली होती. ही इमारत बांधून 13 वर्ष होत आली आहेत.

अलिबाग शहराचा दिवसेंदिवस विकास साधत असताना, शहरातील सुरक्षा व स्वच्छता अधिक चांगल्या पध्दतीने करण्याचा प्रयत्न अलिबाग नगरपालिकेने केला आहे. मासळी खरेदीसाठी हजारोच्या संख्येने नागरिक येत असतात.

मासळी बाजार पेठेत व परिसरात  सुरक्षेबरोबरच अधिक स्वच्छतेच्यादृष्टीने पावले उचलण्याचा निर्णय अलिबाग नगरपालिकेने घेतला आहे. अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक व मुख्याधिकारी महेश चैाधरी यांनी मासळी बाजार पेठेत जाऊन पाहणी केली. तेथील जागेची पाहणी करून वेगवेगळ्या सुविधा कशा पध्दतीने राबविण्यात नियोजन केले आहे. यावेळी उपनगराध्यक्षा अँड. मानसी म्हात्रे व मासळी विक्रेत्या महिला उपस्थित होते.

 मासळी बाजार पेठेत व परिसरात चार सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.  इमारतीच्या बाजुला वेगवेगळ्या प्रकारचे टाईल्स लावून हा परिसर अतिशय चांगला बनविण्यात येणार आहे. तसेच स्वच्छतेसाठी मासळी बाजारपेठेमध्ये बाथरुम बांधले जाणार आहे. जेणेकरून मासळी बाजारपेठ व परिसर अधिक स्वच्छ व सुरक्षीत राहण्यास मदत होणार आहे. याचे लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग