बेळगाव,दि.८

                  जिल्ह्यातील गोकाक,अथणी आणि कागवाड विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी सोमवारी  आर पी डी कॉलेजमध्ये  होणार आहे.सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक ती तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ एस.बी.बोमनहळ्ळी यांनी दिली.मतमोजणी केंद्रात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नोडल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी पोलीस आयुक्त लोकेशकुमार,उपायुक्त सीमा लाटकर,उपायुक्त यशोदा वंटगोडी ,जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी आदी अधिकारी उपस्थित होते.

                     मतदान यंत्रे कडेकोट बंदोबस्तात आर पी डी कॉलेजमधील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत.तीन पदरी सुरक्षा व्यवस्था स्ट्रॉंग रूम सभोवती ठेवण्यात आली आहे.उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम सकाळी उघडण्यात आली आहे.

          मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत.मतमोजणीचे वार्तांकन करायला जाणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना देखील ओळखपत्रे देण्यात आली आहेत. सुरक्षा,पार्किंग,इंटरनेट सेवा,निवडणूक अधिकाऱ्यांचे दालन,उपहार आणि भोजन सेवा,माहिती केंद्र याची माहिती उपस्थित अधिकाऱ्याकडून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली.

               खबरदारीची उपयाययोजना म्हणून द्यकीय सेवा,रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल देखील मतदान केंद्रात असणार आहे.जनतेला मतमोजणीची माहिती समजावी म्हणून ध्वनिवर्धकांची व्यवस्था करण्यात आली आहे.प्रत्येक फेरीनंतर माहिती घोषित केली जाणार आहे.

      प्रत्येक मतदारसंघासाठी चौदा टेबल मतमोजणीसाठी असणार असून मतदान संख्येप्रमाणे जास्तीतजास्त 21 मतमोजणीच्या फेऱ्या होतील.निवडणूक आयोगाच्या परवानगी नंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.मतमोजणी  केंद्रात मोबाईल नेण्यास परवानगी नसून माध्यम प्रतिनिधींना मोबाईल नेण्यास परवानगी असून मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी जाताना माध्यम प्रतिनिधींनी मोबाईल माध्यम केंद्रात ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

अवश्य वाचा