सांगोला

बदलत्या हवामानाचा परिणाम व शरीरातील कमी रोग प्रतिकार शक्ती यामुळे दिवसेंदिवस नव-नवीन आजारात भर पडत आहे. डेंग्यू चा डंक अद्यापही सांगोला शहर व तालुक्यातून कमी झालेला नाही. आजही अनेक दवाखान्यात डेंग्यू सदृश्य रुग्णांची संख्या लक्षणीय असल्याचे बोलले जात आहे. शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक गावात डेंग्यूची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यात विशेष करुन अनेक रुग्णांना शरीरातील पेशी झाल्यामुळे दवाखान्यात मोठ्या प्रमाणात हेलपाटे मारण्याची वेळ आलेली आहे.

रक्तातील पेशी व त्या संंबंधीचे विविध आजार याविषयीची चर्चा गेल्या काही वर्षापासून होताना दिसत आहे. घरातील जेष्ठ मंडळींना व जुन्या जाणत्यांना याविषयी विचारले असता ते सहजच म्हणतात, आमच्या काळात कुठलं आलंय डेंग्यू आणि पेशी कमी जास्त होण्याचा आजार! यामुळे वैद्यकीय क्षेत्राला अच्छे दिन आले असल्याचे दिसत आहेत. ताप व तापानंतर रक्तातील पेशींचे प्रमाणही घटल्यामुळे किमान दहा ते पंधरा दिवस वैद्यकीय उपचार घ्यावा लागत आहे. दवाखान्यात जाण्याबरोबरच विविध प्रकारच्या रक्त व लघवीच्या चाचण्या करणे गरजेचे असल्यामुळे सर्वसामान्य, गरिब कुटुंबातील व्यक्तींच्या हा आजार नको रे बाबा असेच म्हणायची वेळ आली आहे.

प्रत्येकजण आपले शरिर सदृढ रहावे यासाठी धडपडत असतो. वैद्यकीय औषधोपचार घेण्या बरोबरच घरगुती उपाययोजनांवरही सध्या भर दिला जात आहे. औषधे, गोळ्या, सलाईन, याचा तिटकारा असणारे अनेकजण आयुर्वेदातील काही उपचार आत्मसात करत आहेत. यामध्ये समाज माध्यमाचा वापर करुन आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. तसेच ज्यांना पेशी कमी आहेत त्यांना अनेकजण पपई व ड्रॅगन फुड खाण्याचा सल्ला देत आहेत. तुळशीच्या पानांचा रस, पपईच्या पानाचा रस, बीट, लिंबू सरबत, या व यासारख्या इतर घरगुती उपचारांचे सल्ले अनेक मित्रमंडळी व नातेवाईक देत आहेत. परंतु रक्तातील पेशी कमी होण्यामुळे खिशावरचा ताण मात्र अधिक झाला असल्याचे बोलले जात आहे.

अवश्य वाचा