चिपळूण 

कोकण इतिहास परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष आणि इतिहासाचे गाढे व्यासंगी डॉ. दाऊद दळवी यांनी केलेच्या संशोधन कार्याचा गौरव करून लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने नव्याने उभारलेल्या सुरेश भार्गव बेहेरे कलादालनात डॉ. दळवी यांचे तैलचित्र लावले आहे. या पार्श्वभूमीवर कलादालनाला नुकतीच डॉ. दळवी यांच्या पत्नी श्रीमती जमिला दळवी, अमेरिकेत वास्तव्यास असलेले त्यांचे चिरंजीव अंजुम दळवी आणि कुटुंबियानी भेट देऊन पाहणी केली.

प्राचीन इतिहास या विषयात डॉक्टरेट मिळविलेले प्रा. दळवी सन १९६५ ते १९८६ या काळात मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात, इतिहास व पुरातत्त्व अभ्यासमंडळाचे सदस्य होते. आयडियल एज्युकेशन सोसायटी, कोकण इतिहास मंडळ, समर्थ भारत व्यासपीठ आदी संस्थांचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. ‘मराठी ग्रंथ संग्रहालय-ठाणे’, इन्स्टिटय़ूट ऑफ हिस्टॉरिकल स्टडीज्, इंडियन हिस्ट्री अ‍ॅन्ड कल्चरल सोसायटी आदी संस्थांचे कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ‘लेणी महाराष्ट्राची’ हे त्यांचे पुस्तक अत्यंत गाजले. या पुस्तकाची इंग्रजी आवृत्तीही प्रसिद्ध झाली. या शिवाय मुस्लिम स्थापत्यकला, असे घडले ठाणे आदि लोकप्रिय पुस्तकांचे लेखन त्यांनी केले. स्थानिक इतिहासाच्या अभ्यासावर त्यांनी विशेष भर दिला. राष्ट्रपती झाकीर हुसेन राष्ट्रीय पुरस्कार, ठाणे भूषण, जनकवी पी. सावळाराम आदी पुरस्कारही त्यांना लाभले.

वाचनालयाने कलादालनात डॉ. दळवी यांचे तैलचित्र लावल्याचे अंजुम दळवी यांना समजले. त्यांनी वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून आम्ही कलादालन पहायला येत आहोत असे कळविले. त्यानुसार श्रीमती जमिला दळवी यांच्यासह अंजुम दळवी आणि कुटंबिय नुकतेच कलादालनास भेट देऊन गेले. कलादालनातील सर्व तैलचित्रे पाहून दळवी यांच्या कुटुंबियांनी, ‘चिपळूण सारख्या लहान गावात वाचनालयाने संग्रहालय आणि कलादालन निर्माण करून अभ्यासकांना आणि पर्यटकांना पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. डॉ. दाऊद दळवी यांच्याही कार्याचा वाचनालयाने गौरव केला आहे’ अशा शब्दात श्रीमती दळवी यांनी वाचनालयाचे आभार मानले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष अरूण इंगवले‚ कार्यवाह विनायक ओक उपस्थित होते. विनायक ओक यांच्या हस्ते अंजुम दळवी आणि श्रीमती जमिला दळवी यांना ग्रंथभेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 

अवश्य वाचा

पैशांसाठी देशद्रोह

टीकेकडे लक्ष द्या...