चिपळूण 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष, नाटककार, कवी प्रा. संतोष गोनबरे यांना १० ते १२ जानेवारी २०२० रोजी उस्मानाबाद येथे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादाचे निमंत्रण प्राप्त झाले आहे. प्रा. गोनबरे हे या संमेलनात ‘एकविसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे ?’ या विषयावर चिंतनपर आणि ज्ञानवर्धक साहित्य अनुषंगाने आपले विचार मांडतील.   

सुपरिचित प्राणीकथांच उपहासगर्भ पुनर्कथन, जुन्या कथांचा काळानुसार अन्वयार्थ असलेला ‘माकडहाड डॉट कॉम’ हा गोनबरे यांचा कथासंग्रह नुकताच पुण्याच्या संस्कृती प्रकाशनतर्फे प्रकाशित झाला आहे. आपल्या संस्कृत वाड्मयातील विष्णूशर्मांचे पंचतंत्र, पाश्चात्य इसापच्या नीतिकथा, महानुभाव पंथातील चक्रधर स्वामींच्या दृष्टांतकथा आदि माध्यमातून लेखनात प्राणीसृष्टीचा वावर झालेला आहेच ! गोनबरे यांनी कालातीत संदर्भांसह उपहासगर्भ कथेच्या फॉर्ममध्ये हा प्राणीसृष्टीचा वावर आणला आहे. मराठी कथा क्षेत्रातला आजवर न हाताळला गेलेला हा नवा प्रयोग आहे. गोनबरे हे आंबडस ज्युनियर कॉलेजमध्ये कार्यरत असून गतवर्षी डिसेंबर महिन्यात त्यांच्या नेतृत्वाखाली भूवनेश्वर-ओरिसा येथे झालेल्या २६ व्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी जिल्ह्यातून आंबडस हायस्कूलची आरती मोरे हिची ‘ग्रीन ग्रास फ्रॉम अ‍ॅग्रिकल्चरल वेस्ट’ या प्रकल्पासाठी निवड झाली होती. या प्रकल्पाचे माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांनीही कौतुक केले होते.

प्रा. गोनबरे हे आपल्या मूळ रानपाट गावीही साहित्य उपक्रम, डिजिटल क्‍लासरुम आणि वाचनालय चळवळ राबविण्यासाठी कार्यरत असतात. चिपळूणातील साहित्यिकांची आजवर अखिल भारतीय स्तरावर निमंत्रितांच्या कवी संमेलनासाठी निवड झालेली आहे. अखिल भारतीय स्तरावरील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर परिसंवादात कोकणचे प्रतिनिधित्त्व या निमित्ताने होणार असल्याने लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष अरुण इंगवले, कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांच्यासह चिपळूणच्या साहित्य वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

अवश्य वाचा