पनवेल   

                  पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतुन स्कुटी, ऍक्टिव्हा, युनिकॉर्न, केटीएम, बजाज बॉक्सर, ऍक्सेस इ. मोटार सायकल व स्कुटी सारख्या दुचाकी गाड्या चोरणाऱ्या ६ आरोपींना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेमार्फत अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या एकूण १२ दुचाकींपैकी ७ आणि चोरीसाठी वापरले गेलेली हत्यारे पोलिसांनी हस्तगत केली. सदर आरोपी हे पनवेलमध्येच वास्तव्यास असलेले तपासात समोर आले आहे. 

                  पनवेल शहर पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या या ६ आरोपींना यापूर्वी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल १० दुचाकी तर सानपाडा पोलीस ठाणे हद्दीत ०१ आणि खारघर पोलीस ठाणे ०१ असे एकूण १२ दुचाकी चोरी केल्या होत्या. मात्र यातील ५ दुचाकी या बेवारस स्थितीत सोडून दिल्यामुळे त्या दुचाकी बेवारस स्थितीत पोलिसांना आढळून आल्यानंतर त्यांनी त्या त्या वेळी दुचाकी मालकांना पोहोच केल्या होत्या. दुचाकी चोरीचा वाढत आलेख आणि चोरीची एकच पद्धती लक्षात घेता चोरी करणारे तेच चोर असण्याची शक्यता बळावली. त्यानुसार पोलीस आयुक्त संजय कुमार, सह पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर व पोलीस उप आयुक्त अशोक दुधे यांनी विशेष प्रयत्न करण्याबाबत दिलेल्या सूचनांनुसार  सहा.पोलीस आयुक्त रविंद्र गिडडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी गुप्त बातमीच्या आधारे तसेच तांत्रिक तपासाच्या आधारावर मोटारसायकल चोरीच्या गुन्हयातील ६ आरोपींना दि. ०५ डिसेंबर रोजी अटक केली. 

                   यावेळी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ४ अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मौज-मजेसाठी एकुण १२ मोटार सायकल तसेच स्कुटी चोरी करून गाडीतील पेट्रोल संपेल तेथे वाहने बेवारस सोडुन देत असल्याचे सांगितले. यावेळी पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुशिल सुनिल म्हस्के, वय २५ वर्षे, धंदा - नोकरी, रा. कोपरा गांव, सेक्टर १० खारघर, नवीमुंबई आणि संतोष राजकुमार कांबळे, वय १८ वर्ष, धंदा-भंगार वेचने, रा. मालधक्क्का शेड, पनवेल असे असून या दोन्ही आरोपींना ७ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तसेच या गुन्ह्यात समावेश असलेल्या ४ अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकांची रवानगी बाल निरीक्षण गृह, कर्जत, जि.रायगड येथे करण्यात आली. सदरची कारवाई पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक, सुनिल तारमळे, पोहवा विजय आयरे, पोहवा रविंद्र राऊत, पोना राजेश मोरे, पोना अमरदिप वाघमारे, सुनिल गर्दनमारे व पोशि यादवराव घुले यांनी केली आहे.

 

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी