मुंबई दि. ६ डिसेंबर 

आजवर फारसा परिचित नसलेल्या नागपूरच्या इर्शाद अहमदने आपल्या कारकिर्दीतला पहिला आंतरराष्ट्रीय किताब जिंकताना भारताच्याच विश्‍वविजेत्या प्रशांत मोरेचा तीन सेट चालेलेल्या अटीतटीच्या लढतीत ३-२५, २५-१४ आणि २५-२४ असा पराभव केला. अशा रितीने ८ व्या आंतरराष्ट्रीय कॅरम  फेडरेशन  चषक स्पर्धेचा मुहूर्त साधत इर्शादने आपल्या आगमनाची जणू नांदीच केली.  तो या स्पर्धेमधला जयंट किलर ठरली. त्याने उपांत्यपूर्व फेरीत माजी जगज्जेता निशांत फर्नांडो (श्रीलंका) माजी राष्ट्रीय विजेता आणि आंतराष्ट्रीय जहीर पाशा याचा उपांत्यफेरीत अशा दोन मोठ्या शिकारी केल्या होत्या. इर्शादला आजपर्यंत केवळ एकच राष्ट्रीय विजेतेपद जिंकता आले होते. हीच त्याची जमेची बाजू होती. या निकालानंतर कॅरमचे आयकान सुहास कांबळी यांची प्रतिक्रीया फारच बोलकी होती. कॅरम बरेच काही शिकवून जातो. भल्याभल्यांचे येथे पानिपत झाले आहे.

भारताला पुरुष आणि महिला विभागातली सर्व पदके मिळणार हे नक्की होते कारण उपांत्य फेरीत देशातले कोणीच पोहोचले नव्हते. महिलांमध्ये मात्र काही उलट फेर झाला नाही. विश्‍वविजेत्या एस. अपूर्वाने काहीशा अनपेक्षितपणे अंतिम फेरीत पोहचलेल्या आयेशा साजिदवर महत्प्रयासाने १०-२५, २५-२२ आणि २५-६ अशी मात केली. आयेशाने दुसरा सेट २२-९ अशा आघाडीनंतर हातचा गमावला त्यापाठोपाठ सामना देखील. अपूर्वाने मिळालेले जीवदान साजरे करताना तिसर्‍या सेटमध्ये जी २०-० अशी केवळ तीन बोर्डात आघाडी घेतली तेथेच विजेतेपदाचा निकाल स्पष्ट झाला.

जेव्हा प्रशांत मोरेने पहिल्याच बोर्डमध्ये  ब्रेक -टू-फीनीश केला तेव्हा इर्शाद चांगलाच हादरला. त्याच्यासाठी हे व्यासपीठ नवेच होते. मात्र दुसर्‍या गेममध्ये त्याने स्वतःला सावरले. त्याने १०-० अशी आघाडी घेत भक्कम व सावध सुरुवात करत दुसर्‍या सेटचाच नव्हे तर सामना जिंकण्यासाठी पाया रचला. त्यानंतर आठ गुणांचा पाचवा बोर्डही जिंकला. तिसर्‍या सेटमध्ये तो ०-६ असा सरुवातीसच पिछाडीवर पडला. पण त्याने हळूहळू जम बसविला. त्याच्या कट-शॉटस् ला मग वेगळीच धार आली. प्रशांतने या सेटमध्ये एक  ब्रेक -टू-फीनीश   केला व १९-६ ही पिछाडी १९-१८ अशी भरून काढली. त्यानंतर २४-२० अशी आघाडी घेतली. मात्र डगमगून न जाता इर्शादने स्वतःच्या ब्रेकवर मोठा बोर्ड जिंकत विजयश्री खेचून आणली.

राजेश गोहिल आणि रश्मी कुमारी यांनी तिसरे स्थान पटकविताना अनुक्रमे झहीर पाशा आणि के नागज्योती यांना पराभूत केले ते २५-०, १०-२५, २५-१५ आणि २५-१३, २५-१६ अशा ङ्गरकाने

या स्पर्धेचा रंगतदार बक्षिस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आणि अखिल भारतीय कॅरम महासंघाचे कार्याध्यक्ष गिरीश व्यास यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष जोसेफ मेयर, महासचिव व्ही.डी. नारायण तसेच महाराष्ट्र कॅरम संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र शहा, महासंघाचे सचिव भारती नारायण, कोषाध्यक्ष अरूण केदार, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री. भारत देसडला, सचिव यतीन ठाकूर, कॅरम असोसिएशन ऑफ पुणे चे सचिव नंदू सोनावणे हे मान्यवर उपस्थित होते.

सहा दिवस खेळवण्यात आलेल्या या आंतराष्ट्रीय कॅरम स्पर्धेमध्ये चोवीस  ब्रेक -टू-फीनीश ची नोंद झाली असून त्यापैकी एकट्या जहीर पाशाने आठ वेळा ही किमया केली. याशिवाय पंधरा ब्लॅक टू ङ्गिनिश नोदविले गेले.

या प्रतिष्ठीत आंतराष्ट्रीय चषक कॅरम स्पर्धेत एकाच वेळी ४४ आंतरराष्ट्रीय दर्जेचे सिनको कॅरम बोर्ड व सिसका स्पेशल एडीशन लेजंड कॅरम सोंगट्या वापरण्यात आले. या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कॅरम पंच श्री. अजित सावंत व त्यांचे सहायक पंच म्हणून आंतराष्ट्रीय कॅरम पंच श्री. काशीराम व श्री. केतन चिखले यांनी उत्कृष्ट संचलन केले.

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी