कर्जत- दि.6 

               कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोड्या प्रकरणातील आरोपी पकडण्यात कर्जत पोलिसांना यश आले असून एकूण तीन गुन्ह्यातील 4 लाख 36 हजार 324 रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

            कर्जत नगर परिषद क्षेत्रातील मुद्रे येथील शिवानी पार्क येथे राहणारे विशाल शाम कांबळे हे दि.17 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी  सव्वा एकच्या सुमारास आपल्या कुटुंबासमवेत जवळ असलेल्या नाना मास्टर नगर येथे आपले नातेवाईक यांच्याकडे तेराव्याच्या कार्यक्रमासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या लाकडी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील शोकेस च्या कपाटातील 4 लाख 60 हजार 16 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याबाबत विशाल शाम कांबळे यांनी कर्जत पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली होती. 

                गुन्ह्यांचा तपास पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण भोर हे करीत होते, सदर गुन्हे तपासातील पथक पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे, पोलीस हवलदार संदेश सानप, पोलीस नाईक सचिन नरुटे, पोलीस शिपाई भूषण चौधरी, पोलीस शिपाई रुपेश म्हात्रे, पोलीस शिपाई सागर नायकुडे यांनी गुन्ह्यातील घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचा मागवा घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपी राजेश अरमोहन शेट्टी, मुरगन राम शेट्टी, कमलेश राजेंद्र शेट्टी, राजेश उनाई माळी हे सर्व राहणार मद्रासी पाडा उल्हासनगर, जिल्हा ठाणे यांना उल्हासनगर येथे अटक करण्यात आली.

             आरोपींनी गुन्हा कबूल केला असून गुन्ह्यातील चोरलेल्या मला पैकी 3 लाख 93 हजार 324 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे, तसेच सदर गुन्ह्यातील त्यांचे इतर दोन साथीदार यांची नावं निष्पन्न झाली आहेत मात्र त्यांना अद्याप पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.

             सदर घरफोडी तपास करीत असताना आरोपी व त्यांचे साथीदार यांनी कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दी मध्ये अजून तीन घरफोड्या केल्याची कबुली पोलिसांना दिली, त्या तीन घरफोडीतील गेलेल्या माला पैकी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा मिळून एकूण 43 हजार रुपये हस्तगत केले आहे, एकंदरीत कारवाईमध्ये सदर गुन्ह्यात तसेच इतर तीन गुन्ह्यातील मिळून एकूण 4 लाख 36 हजार 324 रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात कर्जत पोलिस ठाण्याला यश आले आहे.

               पुढील आरोपींचा तपास कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर करीत आहेत.

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी