नेरळ,ता.5

                             नेरळ जवळील ममदापुर येथील एका बांधकाम साईट वर कर्नाटक राज्यातील महिला मजुराचा मृत्यू झाला होता.त्या मृत्यूस कारणीभूत असल्याने त्या बांधकाम साईट चे ठेकेदार याच्यावर मृत्यूस कारणीभूत असल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र मृत्यू झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने गुन्हा दडवून ठेवण्यासाठी मृत्यूमुखी पडलेल्या महिलेला उचलून कर्नाटक राज्यात गावी नेले.दरम्यान, अपघात झाला असताना ठार झालेल्या व्यक्तीचे शव विच्छेदन केले नसल्याने नेरळ पोलिसांनी ठेकेदारावर मनुष्यवधास कारणीभूत असल्याने गुन्हा दाखल केले आहे.

                             नेरळ जवळील ममदापुर येथील ड्रीमज इन्फोटेक गार्डन व्ह्यू रेसिडेन्सी येथे इमारतीचे काम सुरू असताना एका महिला कामगाराचा मृत्यू झाला होता.27 नोव्हेंबर रोजी चौथ्या मजल्यावर असलेली साहित्य वाहून नेण्याची लिफ्ट अंगावर पडल्याने कविता अर्जुन पवार या 25 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.त्यावेळी अन्य दोन महिला देखील जखमी झाल्या होत्या,मात्र रुग्णालयात नेताना त्यातील अत्यवस्थ असलेली महिला मजूर कविता पवार यांचा मृत्यू झाला होता.जी लिफ्ट चौथ्या  मजल्यावरून पडून अपघात घडला ती लिफ्ट चालविताना इमारतीचे बांधकाम करणारे ठेकेदार विजय राठोड याने कोणतीही खबरदारी घेतली नव्हती.त्याचवेळी कामगारांना सुरक्षेचे कोणतेही साधन दिले नसल्याने त्या मजूर महिला कामगाराला आपला जीव गमवावा लागला होता.

                           त्याबाबत संबंधित ठेकेदार यांने बांधकाम मजुरांबाबत कोणतीही खबरदारी न घेतल्याने अपघात घडून महिलेचा मृत्यू झाला होता.मात्र आपले अपराध लपविण्यासाठी ठेकेदार विजय राठोड याने मृत्यू मुखी पडलेल्या महिलेबद्दल नेरळ पोलीस ठाण्यात कोणतीही माहिती दिली नाही.त्याचवेळी सदर मृतदेह नेरळ येथून बदलापूर आणि तेथून कर्नाटक राज्यात नेला आणि गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला.मात्र नेरळ पोलिसांनी संबंधित इमारतीचे मालक यांना ठेकेदार आणि कामगार यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने मृत महिलेचे पती अर्जुन खेरू पवार यांना तक्रार देण्यास सांगितले.त्यानंतर विलंबाने संबंधित गुन्ह्याची तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.नेरळ पोलिसांनी त्यावर बांधकाम ठेकेदार विजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. कामगारांच्या हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल पोलिसांनी भादवी कलम 304 (अ),3,37 खाली गुन्हा दाखल केला आहे.जिल्हा पोलिस उपअधीक्षक अनिल घेरडीकर आणि नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार म्हात्रे हे अधिक तपास करीत आहे. गुन्ह्यातील आरोपी विजय राठोड याला अद्याप अटक करण्यात आली नाही.

 

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी