बेळगाव,दि४

                गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या कांद्याच्या दराने बुधवारी उच्चांक गाठला.बुधवारी बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सतरा हजार रुपये क्विंटल इतक्या उच्चांकी दराने कांद्याची विक्री झाली.एकशे सत्तर रुपये किलो असा हा भाव होतो.आजवर बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत इतका चढा भाव कांद्याला कधीच मिळाला नव्हता.आजवरचा कांद्याचा हा विक्रमी दर आहे.

                 महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे सगळ्यात मोठे नुकसान कांद्याचे झाले आहे.त्यामुळे बाजारपेठेत कांद्याची आवक कमी झाली आहे.मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्यामुळे कांद्याच्या दरात सातत्याने महिन्याभरापासून वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.बुधवारी आणि शनिवारी खरेदीदार अधिक असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत महाराष्ट्रातून कांद्याचे दोनशे ट्रक आवक होते.पण शेतकऱ्याच्या हाती पीक लागले नसल्यामुळे बुधवारी केवळ तीस ट्रक कांद्याची आवक झाली.उत्तम प्रतीचा कांदा १७० रुपये किलो असून प्रतवारी प्रमाणे १३०रुपये आणि ११०रुपये किलो भाव कांद्याचा झाला आहे.कांद्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे हॉटेलात देखील कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे.अजून काही दिवस तर कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांनी मत व्यक्त केले आहे.

अवश्य वाचा