उरण

   उरण तालुक्यातील अपंगांना दिलेल्या आश्वासना प्रमाणे न्याय देण्याकडे शासकीय पातळीवर दुर्लक्ष केल्यामुळे आज पासून उरण तहसील कार्यालया समोर म्हणजे अपंग दिनीच तालुक्यातील अपंगांनी उपोषण सुरू केले आहे.तहसील कार्यालय व सर्व अपंग बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने ७ फेब्रुवारीला जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल  येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. यावेळी अपंगांची आरोग्य तपासणी झाल्यावर जुने अपंग प्रमाणपत्र अपंगांकडून घेण्यात आले. तसेच नवीन प्रमाणपत्र देण्यात येतील, असे आश्‍वासन देण्यात आले. मात्र नऊ महिन्यांचा कालावधी उलटूनही अपंगांना नवीन अपंग प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

   याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही अपंगांच्या पदरात निराशाच आली.याबाबत उपोषण करू असा इशारा काही दिवसांपूर्वी खोपटे गावातील माऊली अपंग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादेव पाटील यांनी याबाबतचे पत्र उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना दिले होते. तरीही या पत्राकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज अपंग दिनाचे औचित्य साधत उरण तालुक्यातील अपंगांनी उरण तहसील कार्यालया समोर उपोषण सुरू केले. घटनास्थळी जिल्हा सिव्हिल सर्जर डॉ. अमित गवळी व नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी भेट देऊन काही दिवसात हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले होते. मात्र तुम्हाला काही दिवस आधी लेखी इशारा देऊनही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलेत.

   मग आताच उपोषण सुरू झाल्यानंतर तुम्हाला जाग कशी आली असा संतप्त सवाल उपोषणकर्त्यांनी विचारत तहसीलदारांनी ही या उपोषणाकडे पाठ फिरवली असल्याचे सांगितले. मात्र तहसीलदार अंधारे यांना अलिबागला मिटींगसाठी जावे लागल्याने ते उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. उपोषणकर्त्यांनी ठोस आश्वासन तहसीलदार उपस्थित राहून देत नाही तोपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार केला असल्याचे समजते.आपण अपंग एकजुटीने राहिलोतर नक्कीच आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास अपंग बांधवांनी व्यक्त केला. यावेळी अनेक राजकीय व सामाजिक नेतेमंडळीने उपस्थित राहून मार्गदर्शन केले.या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, जिप सदस्य विजय भोईर, कुंदा ठाकूर, पंस सदस्य दीपक ठाकूर,सभापती नरेश घरत, उपसभापती वैशाली पस्टील, माजी सभापती विश्वास म्हात्रे,कामगार नेते संतोष पवार, उरण सामाजिक संस्थेचे सुधाकर पाटील,  माजी जिप सदस्य वैजनाथ ठाकूर, पागोटे सरपंच भार्गव पाटील, राजेंद्र मढवी, माजी सरपंच भावना म्हात्रे, महादेव घरत, भूषण घरत आदींसह अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा