बेळगाव,दि.२-पंचाहत्तर वर्षाच्या  वृद्ध महिलेच्या निधनानंतर तिच्या पश्चात घरात मिळालेले सोन्याचे दागिने,रोख रक्कम   तिच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्याकडे  सुपूर्द करण्यात आली.बेळगाव नार्वेकर गल्लीतील ही घटना आहे.

               सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा केकरे यांनी या सगळ्या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली.घरमालक नातेवाईक ,पोलिस खाते यांच्याशी समन्वय साधून नातेवाईकांकडे दहा तोळे सोने आणि रोख रक्कम सुपूर्द करण्यात बहुमोल कामगिरी बजावली.

             नार्वेकर गल्लीत भाड्याच्या घरात वास्तव्य करणाऱ्या अंजली  बापूसाहेब मनसबदार (७५) यांचे दिनांक १६ नोव्हेंबर रोजी निधन झाले होते.त्यांचा एक मुलगा पूर्वीच मृत झाल्याने  आणि एक मुलगा बेपत्ता असल्याने त्यांच्या पश्चात कोणीही नव्हते.त्यामुळे  गल्लीतील नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले होते .

               अंजली यांचे निधन झाल्यावर    घराचा ताबा कुणाकडे द्यायचा हा प्रश्न घर मालकाला सतावत होता.घरातील सामान काय करायचे हा प्रश्न देखील होताच. त्यावेळी घर मालकांनी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा केंकरे यांना बोलावून प्रतिष्ठित  नागरिकांच्या उपस्थितीत घराला कुलूप लाऊन त्याची चावी शिल्पा यांच्याकडे सुपूर्द केली होती.

                सगळे विधी आटोपल्या नंतर सामाजिक कार्यकर्ते ,घर मालक, पंच मंडळीच्या उपस्थितीत घर उघडून घरातील बॅग आदी साहित्य काढून पाहिले असता  बॅगेत दहा तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम सापडली.दागिन्यांचे वजन करून सर्वांसमक्ष दागिने,रोख रक्कम   शिल्पा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. वृद्ध महिलेचे  कणबर्गी येथील नातेवाईक विजयकुमार अष्टेकर यांना खडेबाजार पोलीस स्थानकात बोलावून शिल्पा केंकरे यांच्या हस्ते त्यांच्या हाती दागिने,रक्कम  सुपूर्द करण्यात आली.

यावेळी खडेबाजार पोलीस निरीक्षक धीरज शिंदे,माजी महापौर विजय मोरे,अभिजित भातकांडे,विजय जाधव महेश रेवणकर आणि डी बी पाटील उपस्थित होते.

 

अवश्य वाचा