पाली-बेणसे: सुधागडसह रायगड व कोकणात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने भातशेतीचा घात केला आहे. त्यामुळे शेतकर्यावर आस्मानी संकट कोसळले आहे. अशातच हतबल झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्याला या नैसर्गीक संकटातून सावरण्यासाठी हेक्टरी 25 हजार रुपयाचा निधी जाहीर करावा अशी मागणी रायगड जिल्हा शेतकरी संघटनेने अध्यक्ष हरिच्छंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान रायगड जिल्हा शेतकरी संघटनेची परळी सुधागडात महत्वपुर्ण बैठक पार पडली. यावेळी शेतकर्यांनी पुढील आंदोलनाची दिशा ठरवली. महाविकास आघाडीच्या सरकारकडून शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी वर्गाला मोठ्या अपेक्षा आहेत. सरकारने देखील शेतकर्यांचे दुख जानून घेवून नुकसानीच्या तुलनेत भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोकणातील शेतकर्‍यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती असून वर्षभर शेतकर्‍याच्या कुटुंबाचे पोट शेतीतून निघणार्‍या उत्पादनावरच अवलंबून असते. मात्र सप्टेंबर 2019 मध्ये कधी नव्हे तशाप्रकारे झालेल्या अतिवृष्टीने व परतीच्या  पावसाने उभे पिक शेतात आडवे झाले. तर अनेक ठिकाणी कापलेल्या पिकांची नासाडी झाली. परिणामी येथील शेतकर्‍यांच्या हातोंडातील घास गळून पडल्याने शेतकरी चिंतातूर व व्याकुळ झाला आहे. अशातच परतीच्या पावसाने जिल्ह्यात हजारो हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. सततच्या अतिवृष्टीने भाताच्या फुलावर पाउस पडल्याने फुले झडून गेली. भाताच्या लोंबीत दाणा तयार झाला नाही. त्यानंतर जो भात निसावला गेला त्या भातपिकावर दसर्यापासून दिवाळीपर्यंत सतत अतिवृष्टी झाल्याने भात जमिनदोस्त होवून भाताच्या लोबिंना अंकूर फुटले. त्यामुळे शेतकरी नुकसानीच्या या धक्क्यातून अद्यापही सावरला नाही. रायगड जिल्हा शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार शासनाने नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे केले. पंचनाम्यात सर्वसाधारण वर्गवारी नुकसान 33 टक्के च्या वर शेतकर्यांचे नुकसान झाले असल्याचे जाहीर करण्यात आले. परंतू प्रत्यक्षात शेतकर्यांचे नुकसान 75 टक्के ते 80 टक्के या प्रमाणात झाले असल्याचे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. शासनाने जिल्ह्यातील शेतकर्यांना गुंठ्याला 80 (8 टक्के ) रुपये नुकसानभरपाई जाहीर करुन नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे. असा संताप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिच्छंद्र शिंदे यांनी केला आहे.

 

एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणार्‍या रायगड जिल्ह्यातील शेती व शेतकरी आता खुप मोठ्या नैसर्गीक संकटात सापडला आहे. सातत्याने नैसर्गीक आपत्तीचा शिकार होत असलेल्या शेतकर्‍याला मायबाप सरकारने आधार देणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत आहे. अशातच लाखोंचा पोशिंदा असलेला बळीराजा जर डोळ्यात आसू घेवून जगत असेल व सरकारकडून देखील त्याची उपेक्षा होत असेल कृषीव्यवसाय येत्या काळात धोक्यात येईल, अन्नधान्याची आयात परवडणारी नसेल परिणामी भावी पिढ्यांना मात्र भुकबळीला सामोरे जावे लागेल असे मत रायगड जिल्हा शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केले.

अवश्य वाचा