काळाची गरज

    औट घटकेचे मुख्यमंञी ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी कितीही आव आणला तरी बहुमत जमविता येत नाही हे स्पष्ट झाल्यावर अखेर राजीनामा दिला. त्यांच्या जाण्याने खणखणीत बहुमत हातात असलेल्या शिवसेना-राष्ट्वादी-कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. फडणवीस यांच्याकडे बहुमत नव्हते हे सुरुवातीपासूनच स्पष्ट झाले होते. परंतु सत्तेच्या जोरावर आपण सर्व काही करु शकतो हा भाजपा नेत्यांचा असलेला माज संविधान दिनाच्या दिवशीच उतरववावा हा एक विलक्षण योगायोग आणि संविधानाचा मोठा विजय मानला पाहिजे. राज्यातील जनतेने युतीला कौल दिला होता हे खरे असले तरीही युतीत जर बेबनाव असेल व युतीतील मोठा भाऊ भाजपा जर धाकट्या भावाला शिवसेनेला कबूल केलेला सत्तेतील वाटा जर द्यायला तर तयार नसेल तर शिवसेनेने त्याविरोधात उठाव करणे काहीच चुकीचे नाही. शिवसेना नेतृत्व गेल्या पाच वर्षात सत्तेसाठी कच खात आल्याने यावेळी एक-दोन जादा मंञीपदे किंवा उपमुख्यमंञीपदाचे तुकडे फेकून शिवसेनेला गप्प करु असा भाजपाचा होरा होता. परंतु यावेळी शिवसेना आपल्या निर्णयावर ठाम होती. तरी देखील शेवटच्या टप्प्यापर्यंत भाजपाने विविध मार्गाने शिवसेनेला चुचकारण्याचा, दमात घेण्याचा प्रयत्न करुन पाहिला. मुंबई महानगरपालिकांच्या काही कंञाटदारांवर पडलेल्या धाडी या शिवसेनेला धमकाविण्याचा निंदनिय प्रकार होता. माञ यावेळी मुख्यमंञीपद नाही तर युती नको अशी उध्दव ठाकरे यांची ठाम भूमिका वाखाणण्याजोगी होती. भाजपाने सत्तेचा सर्व वापर करीत केंद्रातील गृहमंञालयापासून व्हाया राज्यपालभवन अशी सर्व प्रकारची फिल्डिंग लावली होती. पण यावेळी भाजपाच्या सर्व चाणाक्यांचे अंदाज, स्ट्स्टटँटिजी, धोरण सर्वच फेल गेले. राज्यपालांनी तर यावेळी शंभर टक्के पक्षपाती काम केले. त्यांच्या पदाला अशोभनिय असेच त्यांचे काम होते. खरे तर त्यांनी स्वत:हून आपण घेतलेले निर्णय चुकीच होते असे मान्य करीत राजीनामा दिला पाहिजे किंवा केंद्राने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. भाजपाचे हे बुजगावणे राज्यातून अन्यञ हलविले पाहिजे. महाविकास आघाडी ही सत्तेत येण्यामागे उध्दवव ठाकरे जसे ठाम राहिले तसेच शरद पवारांची भूमिकाही मोलाची ठरली.

    मुख्य म्हणजे दोन भिन्न विचारसारणींच्या पक्षांनी एकञ येऊन सरकार स्थापणे ही अशक्यप्राय गोष्टच होती. भाजपाचा देखील हाच अंदाज होता की हे तीन पक्ष एकञ येऊ शकत नाहीत. परंतु शरद पवारांंनी हा जोड शक्य करुन दाखविला. त्याचबरोबर कॉंग्रेसने देखील आपला मुख्य शञू कोण आहे हे नेमके हेरुन आपल्या तत्वांना मुरड घालत सत्ता स्थापनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला तो दूरगामी ठरणार आहे. कॉंग्रेस नेतृत्वाचे याबाबत मन वळविण्याची महत्वपूर्ण कामगिरी शरद पवारांनी केली. शेवटपर्यंत शिवसेने सोबत जाण्याबाबत कॉंग्रेसमध्ये दोन मतप्रवाह होते. न जाऊ इच्छिणारे जोरात होते. परंतु कॉंग्रेस ही नेहमीच आपल्या विचारधारेशी पक्की राहात फ्लेक्सीबल राहिली आहे. परंतु एका हिंदुत्ववादी पक्षासोबत जाण्याचा त्यांनी निर्णय घेणे हे तर एक टोकाचे पाऊल होते. परंतु भाजपाच्या वाढत्या आक्रस्थळपणाला आवर घालण्यासाठी असे करणे गरजेचे होते. यासंबंधी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेणे याबदद्ल त्यांचे कौतुकच झाले पाहिजे. राष्ट्वादी हा पक्ष जरी सेक्युलर असला तरी सत्तेसाठी अगदी सहजरित्या तडजोडी करणारा आहे. 2014 साली त्यांनी याच फडणवीस सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्यासाठी शिवसेनेबरोबर जाणे हा काही मोठा निर्णय नव्हता. माञ राष्ट्वादी व शरद पवार हे दोघेही नसते तर ही आघाडी जन्मालाही आली नसती हे देखील तेवढेच खरे. निवडुकांत ज्या प्रकारे शरद पवारांनी झंझावात केला व प्रचार केला ते पाहता त्यांचे नेतृत्व आता पुन्हा एकदा झाकोळून पुढे आले आहे. राष्ट्वादीचे एवढे आमदार पक्ष सोडून गेले होते की यावेळी बहुदा त्यांना जेमतेम 20-25 जागा मिळतील असा होरा होता. परंतु पवारांनी जनतेच्या मनातील भाजपाच्या विरोधी असलेला रोष बरोबर ओळखला होता. त्यामुळे पक्ष वाढविण्यासाठी व भाकरी परतविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे बरोबर ओळखले होते. त्यांच्या या घणाघाती प्रचाराचा मरगळीस आलेल्या व लढईआधीच मैदान सोडून पळालेल्या कॉंग्रेसला फायदा झाला. अनेक मिडियावीर ज्यांना भाजपाने खरेदी केले होते त्यांना खोटे ठरविण्याचे मोठे काम पवारांनी केले. मिडिया खरेदी केला तसेच इतर पक्षातून आमदार आयात केले की निवडणुका चुटकीसरशी जिंकता येतील हा भाजपाचा विचारही त्यांनी खोटा ठरविला.

    शेवटपर्यंत लढण्याची तयारी पाहिजे, तुमची वैचारिक बैठक पक्की पाहिजे तर तुम्हाला विजयश्री खेचता येते हे पवारांनी दाखवून दिले आहे. पवारांच्या या जिद्दीचा तरुण पिढीने आदर्श ठेवला पाहिजे. शरद पवारांनी पवारांच्या घरात फूट पाडून अजितदादांना आपल्याकडे खेचले परंतु त्यानंतर शरदराव हेही आव्हान पेलण्यास सज्ज झाले. शेवटी त्यांनी आपल्या पुतण्यालाही नाक घासत परतविण्यास भाग पाडले तसेच भाजपालाही चारीमुंड्या चित केले. याच पवारांना भाजपाच्या नेत्यांनी घरी बसण्याचे सल्ले तसेच आता तुमची राजकीय कारकिर्द संपल्याचा आगावू सल्ला दिला होता. परंतु याच पवारांनी त्यांना हे वायफळ सल्ले देणाऱ्यांना सत्तेतून बाहेर खेचले आहे. बरे तेही वयाच्या 80 वर्षाच्या उंबरठ्यावर असताना. भाजपाने सत्तेत असताना जी अरेरावी केली आहे ती जनता पाहत होती, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की जनता त्यांना हाकलते हे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने सिध्द झाले आहे. महाराष्टासारखे एक मोठे राज्य आता भाजपाने गमावले आहे. येथूनच त्यांच्या घसरणीचा आलेख सुरु होणार आहे. त्यांनी ज्य् प्रकारे ईडी, गुप्तचर यंञणांचा पक्षासाठी वापर केला त्यांचे हे कृत्य लोकशाहीच्या चौकटीत बसणारे नव्हते. त्यांच्याकडे आलेल्या नेत्यांना आता स्वगृही परतण्याचे वेध लागतील. अगदी तातडीने नाही तरी जे केवळ सत्तेसाठी गेले होते त्यांची या नव्या सत्ताकारणात घालमेल सुरु होणार आहे. भाजपातील आता गेल्या पाच वर्षात दबले गेलेले फडणवीस विरोधक आता डोके वर काढण्यास सज्ज होतील. एकदा का ही महाविकास आघाडी सत्तेत स्थिर झाली व जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली की भाजपातील अस्वस्थता वाढत जाणार आहे. भाजपाच्या अरेरावीला त्यांच्याच भाषेत पवारांनी व ठाकरेॆनी उत्तर देऊन ही आघाडी स्थापन केली, त्याला कॉंग्रेसची साथ लाभली.

   सध्या तरी या आघाडीची गाडी वेगात धावायला हरकत नाही असे दिसते. सर्वात महत्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंञी असले तरी त्यांचे मुख्य सल्लागार हे शरदरावच असणार आहेत. ठाकरे घराण्यातील पहिला माणूस मुख्यमंञी होत आहे. आजवर बाळासाहेबांनी रिमोट कंट्ोल म्हणून काम करणे पसंत केले होते. परंतु त्यांच्या दुसऱ्याच पिढीने सत्तेत जाऊन जनतेची थेट सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. हे करीत असताना त्यांनी सेक्युलर पक्षांची साथ घेतली आहे. खरे तर वसंतराव नाईकांच्या कॉंग्रेसच्या काळात शिवसेना ही कॉंग्रेसच्या छुप्या पाठिंब्याने वाढली होती. त्यावेळी कॉंग्रेसला कम्युनिस्टांना ठोकायला शिवसेनेचा वापर करायचा होता. आज काळ बदलला आहे. आज भाजपाला संपवायला कॉंग्रेसच्या मदतीला शिवसेना आली आहे. आजच्या काळाची हीच गरज आहे असे म्हणावे लागेल. सत्तेची ही महाविकास आघाडीची गणिते काहीशी अनाकलनीय वाटत असली तरीही सध्याच्या काळानुसार योग्यच आहेत. या नवीन सरकारच्या हातून राज्यातील जनतेची चांगली कामे घडोत याच आमच्याकडून शुभेच्छा.

अवश्य वाचा