सांगोला:-

    सांगोला तालुक्यातील अचकदाणी व आसपासच्या अनेक गांवात अचानक सिंगल फेज वीजेचा पुरवठा सब  स्टेशन मधून बंद केल्यामुळे या सर्व गांवातून महावितरणच्या कारभाराविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकरी अनेक संकटांशी तोंड देत असताना महावितरणकडून आपल्या बेलगाम कारभाराचा शेतीलाच करंट दिला जात असल्याचे शेतकरी वर्गांमधून बोलले जात आहे. दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या अनेक दिवसापासून सिंगल फेज वीजेचा पुरवठा बंद आहे. यामुळे महावितरणच्या या बेलगाम कारभाराला आळा घालणार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.दुरुस्तीच्या नावाखाली बंद करण्यात आलेल्या सिंगल फेज वीजपुरवठा या अगोदरही सुरु होता. तो दुरुस्तीच्या नावाने पुन्हा बंद झाल्याने शेतकरी वर्गासह नागरिकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे. तसे पाहता शेतीसाठी पाण्याबरोबरच वीजेचाही पुरवठा अत्यावश्यक आहे.

    चोवीस तासात ङ्गक्त आठ तास वीज पुरवठा केला जात असल्यामुळे आपण कोणत्या दिशेने विकासाकडे वाटचाल करीत आहोत हेच समजेना. अशी स्थिती नागरिकांची आहे.वीजबीले थकली की, प्रचंड त्रास देणार्‍या महावितरणकडून सेवा देताना मात्र मनमानी कारभार केला जात असल्याचे दिसते. २०२० साली देश महासत्ता होणार अशी स्वप्ने बाळगणार्‍या देशात शेतकर्‍यांना आठ तास वीज पुरवठा तोही कधी खंडीत होईल हे सांगता येत नाही. अनेकवेळा दुष्काळाने होरपळलेल्या या भागात परतीच्या पावसाने पाणी दिले आहे. पण आता विहीरीतील पाणी शेतातील बागा जगविण्यासाठी देण्यासाठी वीजपुरवठा आवश्यक आहे. तर दुसर्‍या बाजूला प्रत्येकाच्या घरी मोबाईल आहे. मोबाईल वापरही प्रचंड वाढला आहे परंतु; वीजेअभावी मोबाईल चार्जिंगविना हातातील निर्जीव खेळणे बनत आहे.तरी ‘‘महावितरणने वीजेचा लघु पुरवठा न करता नावाप्रमाणेच महापुरवठा करावा’’ अशी मागणी अचकदाणी, लक्ष्मीनगर, दंडाची वाडी, सोनलवाडी, बागलवाडी, मठवस्ती, आदि भागातील शेतकरी व नागरिकांमधून होत आहे.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली