सन १८८० च्या सुमारास विल्सन नावाच्या इंग्रज गृहस्थाच्या सर्कशीने मुंबईत धमाल उडवून दिली. आपल्या संस्थानिक मित्राच्या आग्रहाखातर ती सर्कस पाहायला गेले सर्कस संपल्यावर तो गोरा विल्सन त्यांच्यासमोर अभिमानाने म्हणाला सर्कशीतील प्राण्याच्या या कसरती (विशेषता घोडयांच्या) करवून घ्यायचे हे आम्हा इंग्रजांचे काम आहे. कोणीही भारतीय हे करू शकणार नाही हे ऐकताच त्यांच्यातील अस्सल भारतीय जागा झाला, देशाभिमान उसळला. त्यांनी हे आव्हान स्विकारले आणि स्वतःची सर्कस सुरु केली शेवटी त्या विल्सनला आपली सर्कस त्यांना विकणे भाग पडले. त्या विष्णुपंत छत्र्यांनी २४ नोव्हेंबर १८८३ रोजी मुंबईत सर्कस सुरु करून भारतीय सर्कशीला जन्म दिला. त्या छ्त्र्याला जीवनवृतांत म्हणजे एक जिवंत दंतकथाच.पं. विष्णूपंत छत्रे यांचा जन्म १८४० साली झाला. त्यांचे वडील मोरोपंत जामखिंड संस्थानात नोकरीला होते. विष्णूपंतांना लहानपणापासून कुत्री, मांजरी, माकड यांना खेळवण्यात रस होता. त्यामुळे शाळेकडे दुर्लक्ष. जनावरांचा नाद त्याने सोडावा म्हणून वडिलांनी त्याचे लग्न लावून दिले. पण सारे व्यर्थ. अखेर त्यांच्या आईने त्यांना भावे महाराजाकडे चाबुकस्वाराची नोकरी लावली.

    पण मन रमेना आणि य्के दिवशी त्याच्या भेसूर आवाजामुळे तुला उभ्या जन्मात गाता येणारा नाही असे फडके नावाचा गृहस्थ म्हणाल्यावर गायक होऊनच तुला तोंड दाखविन अशी प्रतिज्ञा करून गानविदयेसाठी ग्वाल्हेरला जायचे ठरवले. धोंडोपंत नावाचा त्यांचा मित्र त्याच्यासोबत यायला तयार झाला. पण खिशात पैसा नाही कोणाची ओळख नाही अशा परिस्थितीत त्यांनी ग्वाल्हेर गाठले खरे. पण अनंतहाल अपेष्टा सोसून भिक मागण्याचा प्रसंगही त्याच्यावर या काळात आला.अखेर मजलदरमजल करून ग्वाल्हेरचे बाबासाहेब आमटे यांना भेटून अश्वविद्या पोटाकरता तर गाणे शौका करता शिकावयाचे आहे असे बाणेदार उत्तर दिल्यावर बाबासाहेब त्यांना अश्वविद्या शिकविण्यास तयार झाले. तर गायनासाठी त्यांनी हददुखा यांचे शिष्यत्व पत्करले. पुढे एका वादळाच्या तडाख्यात हददुखा यांची बोट सापडली असता जीवावर उदार होऊन त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे प्राण वाचवल्यावर त्यांनी मनापासून त्यांना गायनाची विद्या दिली. दोन्ही विद्येत पारंगत झाल्यावर त्यांनी घर गाठले आणि फडके समोर गायन करून त्यांना आपले श्रेष्ठत्व मान्य करावयाला लावले. यानंतर परिसरातील अनेक इंग्रज अधिकाराचे, संस्थानिकांचे नाठाळ घोडे त्यांनी ठिकाणावर आणले. लवकरच ‘विशारद’ म्हणून त्यांची ख्याती झाली.

    इंदूर, विचुर, करुंदवाड, जव्हार आदी संस्थानिकाच्या घोड्यांना ते चाल व कवायतींचे शिक्षण देऊ लागले आणि एके दिवशी जव्हार आणि करुंदवाडीचे संस्थानिक मुंबईत खास सर्कस बघायला आले होते. सोबत विष्णुपंतही होते. विल्सन नावाचा कलाकार आपली सर्कस घेऊन मुंबईत १८८२ च्या सुमारास आल होता. सर्कशीतील घोडे, कुत्रे, माकडे यांचे खेळ बघून हे संस्थानिक भलतेच खूष झाले आणि मग विल्सन साहेबाने आव्हान दिल्यावर सुरुवातीस संस्थानिकांनीही विल्सनला साथ दिली. तेव्हा विष्णूपंतांनी या संस्थानिकांकडून ८-१०  घोडे मिळवून कुरुंदवाड येथे सर्कसची तालीम सुरु केली. परिसरातील काही माकडे व उनाड मुळे यांना पकडून त्यांच्याकडून सर्कशीतील इतर कामे करून घेतली. मुंबईच्या गव्हर्नरला त्याची एक झलक  दाखवली. तो भलताच खूष झाला व त्याने छत्र्यांना सर्कस घेऊन मुंबईस येण्याचे आमंत्रण दिले. त्याच सुमारास विल्सनची ‘हार्मिस्टन’ सर्कस शानदार तंबूत गॅसच्या बत्यात राजेशाही थाटात धुमधडाक्यात सुरु होती आणि तो ऐतिहासिक २४ नोव्हेंबर १८८३ चा दिवस उजाडला. विष्णुपंत छत्र्यांची ‘ग्रँड इंडियन सर्कस’ मुंबईच्या क्रॉस मैदानावर उभी राहीली बसण्यासाठी ओबडधोबड मांडव, भाडयाच्या गॅस बत्या आणि मोजक्याच सामानसुमानात या दिवशी लोकांच्या उपस्थितीत सर्कसचा पहिला खेळ सुरु झाला आणि भारतीय सर्कसचा जन्म झाला आणि आश्चर्य घडले.छत्र्यांच्या सर्कशीतील घोडयांच्या कसरतीने सारे अवाक् झाले. प्रेक्षकांची गर्दी छत्र्यांच्या सर्कशीच्या छत्राखाली एकत्र होऊ लागली.

    अहंकारी विल्सनची सर्कस बुडाली. त्याने तंबुसह सारी सर्कस छत्र्यांना विकून टाकली. छात्र्यांनीही मग हाच व्यवसाय पत्करला आणि पाश्चात्यांचे अनुकरण न करता स्वतंत्र अशी भारतीय बाण्याची सर्कस उभी केली. या सर्कसची सुरुवातचमुळी रथात बसलेल्या भारतमातेला सिंह ओढून आणत आणि मग गणा नावाचा हत्ती या भारतमातेला हार घालत असे तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होऊन देशाभिमानाने प्रेक्षकांचे ऊर भरून येत असत. यानंतर छत्र्यांच्या सर्कशीचे चक्र सुदर्शन चक्राप्रमाणे भारतभर  फिरले. पुढे त्यांचा गुरु हरदु:खांचा पुत्र रहिमत खां रस्त्यावर भीक मागतोय हे पाहिल्यावर त्याला आपल्या घरी आणले. मग सर्कशीची सारी धुरा आपला भाऊ काशिनाथ याच्यावर सोपवली आणि रहिमत खां सोबत देशाटनास निघून गेले. त्यांच्या बंधूंनी त्या सर्कशीला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिला.२ फेब्रुवारी १९०६ रोजी इंदोर येथे विष्णुपंत छत्र्यांचे निधन झाले तेव्हा भारतीय सर्कशीचा जनक म्हणून स्वतःचे नाव अजरामर करून घेतले होते.

अवश्य वाचा