अग्रलेखांचे बादशहा असलेले 'नवाकाळ'कार म्हणजे जेष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर होय. सडेतोड विचार, निपक्षपातीपणा, अनेक सामाजिक प्रश्न हाताळण्याची हातोटी आदी अनेक मुद्दे खाडिलकर यांच्याविषयी सांगता येतील. महाराष्ट्रातील वाचकांना त्यांचे अनेक विषयांवरील लिखाण वाचायला मिळाले, हे आम्हा वाचकांचे अहोभाग्यच. त्यांचे निधन झाले असले तरी विचारांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील असंख्य वाचकांना 'नवाकाळ'कार हे कायम सुपरिचित राहातील. साधारणपणे वृत्तपत्रांत वाचक खेळ, राजकारण, नाट्य-चित्रपट जगत, कलाकारांविषयीच्या चर्चा (गॉसिप) अशा गोष्टींचे वाचन करण्यास प्राधान्य देत आला आहे. ज्याचे वाचन दांडगे आहे, वाचनाची आवड आहे, एखाद्या घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याची कायम तीव्र इच्छा आहे अशा स्वरूपाचा वाचक वर्ग दैनिकांतील अग्रलेखाकडे वळत आला आहे. मात्र 'नवाकाळ'कारांनी आपल्या अग्रलेखाकडे असंख्य वाचकांना आकर्षित केले. ते समाजमनातील राजकारण, समाजकारण यांविषयीची सल व्यक्त करून. यातूनच वाचकांना अग्रलेख वाचनाची सवयच जडली.

   परिणामी 'नवाकाळ'कार आणि परखड अग्रलेख असे समीकरणच सिध्द झाले. लेखणीच्या माध्यमातून झंझावात कसा निर्माण करता येतो आणि तो वाचकांना किती भावतो. याचा आदर्शपाठच समाजासमोर त्यांनी ठेवला. त्यांच्या तळपत्या लेखणीचा आसूड काय असतो, लेखणी राजकारण-समाजकारण कशी ढवळून काढू शकते. याचा अनुभव राज्यातील काही राजकीय पुढाऱ्यांनीही घेतला आहे.  लेखणीच्या माध्यमातून जनमानसात स्थान पक्के करणे सोपे नाही. सत्याची मात्रा पचनी न पडणाऱ्या समाजकंटकांना पोटशूळ उठत असतो. यातून प्रसंगी धमक्या, आक्रमणे झेलत लेखणी तळपती ठेवणे कठीण असते. 'हाडाचा पत्रकार'च ते झेलू शकतो. सत्य असले तरी ते एवढ्या परखडपणे कसे काय मांडू शकतात ? यांचे धैर्य कमालीचे आहे, अशी चर्चा 'नवाकाळ'कारांच्या अग्रलेखांवर समाजात वेळोवेळी झाली आहे. समाजमनात योग्य विचारांचे स्थान पक्के करून वाचकाची प्रगल्भता वाढवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या अग्रलेखांच्या बादशहाच्या लेखणीला समस्त महाराष्ट्राच्या वतीने विनम्र अभिवादन !

अवश्य वाचा