ब्रिटिशांच्या काळात औद्योगिक क्षेत्रात ब्रिटिश भांडवलदारांबर यशस्वी टक्कर देऊन उद्योगक्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणारे 'वालचंद हिराचंद' हे 'उद्योगमहर्षी' या उपाधीचे मानकरी आहेत. वालचंद यांचा जन्म २३ नोव्हेंबर, १८८२ रोजी सोलापूर येथील एका जैन घराण्यात झाला. वयाच्या १७ व्या वर्षी सोलापूरच्या सरकारी हायस्कुलमधून ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले. त्यांनी 'कॉलेज न करता आपली व्यापारी पेढी सांभाळावी' असे त्यांच्या वडिलांना वाटे. परंतु त्यांनी मुंबईच्या सेंट झेविअर या कॉलेजमध्ये नाव दाखल केले.

   पण काही घरगुती अडचणीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडून धंद्यातच पडावे लागले. त्यांचे बी.ए. चे शिक्षण सुद्धा अर्धवटच राहिले.तो काळ पारतंत्र्याचा होता. 'राजकीय स्वातंत्र्याबरोबरच आर्थिक स्वातंत्र्यसुद्धा भारतीयांना मिळाले पाहिजे' असे त्या वेळेचे नेते सांगत होते. न्या. रानडे म्हणत, 'भारताचा पक्का माळ तयार व्हावा.' पूण्यात कापडगिरणी निघाल्यावर 'पुण्यातील पहिली चिमणी' हा अग्रलेख लिहून लोकमान्यांनी तिचे स्वागत केले. वालचंद हिराचंद या अशा वातावरणात वाढत होते.

   तेव्हा औद्योगिक क्षेत्रात कर्तृत्व गाजविण्याचा त्यांनी निश्चय केला.आपल्या औद्योगिक कार्याचा शुभारंभ ल. ब. फाटक यांच्याशी भागीदारी करून त्यांनी रेल्वेचे एक कंत्राट मिळवून केला. पण पुढे ते स्वतंत्र व्यवसाय करू लागले. मुंबईत हार्बर रेल्वेच्या कामामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. १९१४ चे पहिले महायुद्ध त्यांच्या पथ्थ्यावर पडले. या काळात बेळगाव, देवळाली,पुणे येथे बराकी बांधण्याचे काम त्यांनी केले. वालचंद अल्पसमाधानी नव्हते. एकाच प्रकारची कामे करणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. ब्रम्हदेशातील नदीवर पूल बांधण्याचे आव्हानात्मक काम त्यांनी पूर्ण केले. तसेच बोरघाटातील धोकादायक बोगद्याची कामेही त्यांनी पूर्ण केली. बांधकामाच्या क्षेत्रात टाटांचे सहकार्य घेऊन अनेक कामे त्यांनी केली. अल्पावधीतच त्यांचा दबदबा निर्माण झाला. त्यांच्या स्वतःच्या प्रिमिअर कन्स्ट्रक्शन व हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन ह्या कंपन्या प्रसिद्धीच्या झोतातआल्या.

   चौकसपणा ही वालचंदाची खासियत. त्यांची चौकस बुद्धी सदैव जागृत असे. एकदा प्रवासात ग्वाल्हेरच्या महाराजांची बोट विकायची आहे, हे कळताच त्यांनी ती विकत घेतली. कशासाठी ? तर ब्रिटिशांची सागरी वाहतुकीची मक्तेदारी मोडण्यासाठी. लॉर्ड इंचकेप हा या मक्तेदारीचा प्रमुख होता. सरकार त्याच्या पाठीशी होते. तेव्हा तो वालचंदजींना म्हणाला, "तुम्ही समुद्रावरचे चाचे आहात." तेव्हा "चाचे कोण ? चाचे तुम्हीच !" असे लंडनला त्यांच्या कार्यालयात वालचंदजींनी ठणकावले. हा त्यांच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंग आहे. विमानबांधणीचा कारखाना काढून पूर्ण केले. १९४४ मध्ये मोटार बनविणारी 'प्रीमिअर ऑटोमोबाईल्स' हि कंपनी काढली. कारखानदारीबरोबरच शेतीकडे हि ,लक्ष देणारे वालचंदजी हे आधुनिक काळातील शेवटचे उद्योगपती. शेतकी तंत्रात त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणजे रावळगाव व वालचंदनगर येथे उभ्या राहिलेल्या वसाहती व साखर कारखाना. कारखाना काढला तर यंत्रदुरुस्तीचे काय ? तेव्हा कारखान्यांना लागणारी यंत्रसामग्री बनविण्याची व्यवस्था त्यांनी आपले बंधू गुलाबचंद यांना करायला लावली. वालचंदनगर हा परिसर अतिशय दरिद्री व मागासलेला होता.

   पण वालचंदजींनी त्यांचे संपन्न उद्योगनगरीत रूपांतर केले. या भागाचा कायापालट कसा झाला, याचे वर्णन श्री.माटे यांनी आपल्या अप्रतिम शैलीत केले आहे. श्री. माटे हे मूळचे तिथलेच होते.बांधकाम, जलवाहतूक, जहाजबांधणी, विमानांचा व मोटारींचा कारखाना इत्यादींची उभारणी करताना वालचंदजींनी मोठा संघर्ष केला आणि त्यांचे जीवन नाट्यमय बनले. त्यांच्या जीवनातील हे नाट्य त्यांचे चरित्रकार खानोलकर यांनी मार्मिकपणे केले आहे. असे हे आधुनिक औद्योगिक भारताचा पाया घालणारे उद्योगमहर्षी वालचंद ८ एप्रिल, १९५३ रोजी अनंतात विलीन झाले.  

अवश्य वाचा